Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी शनिवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या कार्यालयात कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर या दोघांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. 15 खेळाडूंच्या या टीमचे नेतृत्व रोहितकडे देण्यात आले तर उपकर्णधारपदाची माळ ही शुभमन गिलच्या गळ्यात पडली. मात्र आता समोर येत असलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड करत असताना कर्णधार रोहित आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात मतभेद होते, ज्यामुळे संघ जाहीर करण्यास दिरंगाई झाली.
रविवारी दैनिक जागरणमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट संघाचे हेड कोच गौतम गंभीर याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हार्दिक पंड्याला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवायचे होते तर कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर हे दोघे शुभमन गिलला उपकर्णधार करण्याच्या बाजूने होते. ऑल राउंडर हार्दिक पंड्या हा वनडे वर्ल्ड कप 2023 आणि टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा भाग होता. पण त्यानंतर त्याला उपकर्णधार पदावरून हटवण्यात आले. रोहितने जून 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती त्यावेळी हार्दिक पंड्याला कर्णधार बनण्याची पूर्ण तयार झाली होती, परंतु सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले.
शुभमन गिलकडे ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंका विरुद्धच्या वनडे सिरीज दरम्यान उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. सिलेक्टर कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकरने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा करताना सांगितले की गिल श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये उपकर्णधार होता म्हणून त्याला चॅपियन्स ट्रॉफीमध्ये देखील उपकर्णधारपदी जारी ठेवण्यात आलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंत आणि केएल राहुल यांना संधी देण्यात आली आहे. मात्र हेड कोच गौतम गंभीर याला ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसन याला संधी द्यायची होती. परंतु रोहित आणि आगरकर यांना विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतच हवा होता. टीम सिलेक्शन करताना बऱ्याच गोष्टींवर मतभेद झाल्यामुळे टीम सिलेक्शनची बैठक जवळपास अडीच तास लांबली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले.
THE LONG MEETING REASONS.
- Gautam Gambhir wanted Hardik Pandya as Vice Captain.
- Agarkar and Rohit agreed for Shubman Gill.
- Gambhir wanted to include Sanju Samson as Wicketkeeper.
- Agarkar and Rohit were happy to go ahead with Rishabh Pant. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/m1sMWAhwJo— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) January 19, 2025
20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश
23 फेब्रुवारी : रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान
2 मार्च : रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड
रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा