तुमच्याकडे कोणी बाईकची टेस्ट ड्राइव्ह मागत का? शोरुम मालकावर आलीय डोक्यावर मारुन घेण्याची वेळ!

UP Crime: गेलेला माणूस येईल म्हणून शोरुमवाले वाट पाहत राहिले. पण त्यांना शेवटपर्यंत वाट पाहतच राहावी लागली. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 19, 2025, 04:45 PM IST
तुमच्याकडे कोणी बाईकची टेस्ट ड्राइव्ह मागत का? शोरुम मालकावर आलीय डोक्यावर मारुन घेण्याची वेळ! title=
टेस्ट ड्राइव्ह

UP Crime: जगात चांगली माणस आहेत तशी चोर, लुटारुंचीही काही कमी नाहीय. एखाद्याला लुबाडण्यासाठी चोर काय शक्कल लढवतील सांगू शकत नाही. चोरी, लबाडी करु नका, वरचा सारं बघतोय असं आपल्याकडे जुनी माणसं म्हणतात. आता हे वरुन बघण्याचं काम सीसीटीव्ही खूप चांगल्याप्रकारे करतोय. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका धूर्त चोराचा संपूर्ण कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. काय घडलाय प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक माणूस कार शोरूममध्ये आला. त्याने वेगवेगळ्या स्कूटरबद्दल चौकशी केली. यानंतर तो टेस्ट ड्राइव्हसाठी स्कूटर घेऊन गेला. गेलेला माणूस येईल म्हणून शोरुमवाले वाट पाहत राहिले. पण त्यांना शेवटपर्यंत वाट पाहतच राहावी लागली. स्कूटी घेऊन गेलेला माणूस काही मिनिटांतच तेथून गायब झाला. मात्र या संपूर्ण घटनेचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. शोरूम मालकानेही त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो चोराला पकडू शकला नाही. आता हताश झालेल्या मालकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस या स्कूटी चोराचा शोध घेत आहेत.

स्कूटर खरेदी करण्याच्या बहाण्याने शोरूममध्ये 

मुझफ्फरनगरच्या नई मंडी पोलीस स्टेशन परिसरातील एका शोरूममध्ये एक चोर शिरला. त्याने आपण स्कूटर खरेदीदार असल्याचे भासवले. शोरुममध्ये आल्यावर त्याने स्कूटर आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल खूप चौकशी केली. यानंतर त्याने टेस्ट ड्राइव्ह मागितली. जी बहुतेक ग्राहक अनेकदा मागतात. पण टेस्ट ड्राइव्हसाठी स्कूटर घेताच तो पळून गेला, असे शोरूम मालकाने सांगितले. एका कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवरून मी वाहन चोराचा पाठलागही केला होता. पण तो तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचेही पुढे शोरुम मालकाने सांगितले.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये

शोरूमच्या आत आणि बाहेर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. ज्यामध्ये चोर स्कूटर घेऊन येण्याची आणि नंतर पळून जाण्याची घटना कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर कार शोरूम मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्व मालक त्यांच्या शोरूम आणि वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल घाबरले आहेत.