नितेश महाजन (संभाजीनगर) : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोषींना कठोर शिक्षेची मागणी यावेळी करण्यात आली. तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवणं गरजेचं असल्याचं सांगत, यावेळी मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चातील प्रत्येकाचा न्यायासाठीचा एल्गार बघायला मिळाला. हत्येच्या मारेक-यांना कठोर शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नसल्याचा निर्धार संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केला. संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या ही माणुसकीची हत्या असल्याचं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने म्हटलं. न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरु ठेवण्यासाठी कुटुंबाला सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा वैभवीनं केलं.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या माध्यमातून करण्यात यावी तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरांनी केलीये. संभाजीनगरातील जनआक्रोश मोर्चातून आंदोलकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. बीडमधील दहशत थांबवण्यासाठी धनंजय मुंडेंच्या टोळ्या उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्या कृत्याला अजित पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्येतील एका आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही. देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठीच्या मोर्चाच लोण आता महाराष्ट्रभर पोहोचत असून न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.