माईक बंद झाल्याचं समजून रोहित हे काय बोलून गेला... मनातील खदखद आली समोर; पाहा Video

चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ जाहीर करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माईक बंद झाल्याचं समजून रोहितने आगरकरांशी बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. 

पुजा पवार | Updated: Jan 19, 2025, 03:53 PM IST
माईक बंद झाल्याचं समजून रोहित हे काय बोलून गेला... मनातील खदखद आली समोर; पाहा Video title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Sharma : मागील आठवड्यात झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंसाठी काही नवीन नियम जाहीर करण्यात आले. यापैकी एक कठोर नियम म्हणजे परदेश दौऱ्यांवर खेळाडूंसोबत जाणाऱ्या पत्नी आणि कुटुंबावरही बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयकडून कारवाई देखील करण्यात येईल. मात्र बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या काही नवीन नियमांमुळे खेळाडू नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy) संघ जाहीर करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माईक बंद झाल्याचं समजून रोहितने आगरकरांशी बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मात्र त्याचा आवाज माईकमध्ये रेकॉर्ड झाला आणि सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

माईकमध्ये रेकॉर्ड झालं रोहित शर्माचं बोलणं : 

शनिवारी पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा सिलेक्टर कमिटीचे चेअरमन अजित आगरकर सोबत बसला होता. रोहित म्हणाला की, "आता मला सचिव सोबत बसावं लागेल. फॅमिली वॅमिलीचं सर्व बोलायचं आहे, सगळे मला फोन करतायंत यार. सगळे मला विचारतायत यात.  रोहितला वाटलं की समोरचा माईक बंद आहे. मात्र त्याचं बोलणं हे रेकॉर्ड झालं.

रोहित नव्या नियमांच्या प्रश्नावर पत्रकारांवर भडकला : 

पत्रकार परिषदेत रोहित शर्माला बीसीसीआयने केलेल्या नव्या नियमांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रोहित पत्रकाराला म्हणाला, "तुम्हाला या नियमांबाबत कोणी सांगितलं? हे बीसीसीआयच्या अधिकृत हॅण्डलवरून प्रसारित करण्यात आलं आहे का? रोहितने बीसीसीआयने तयार केलेल्या प्रश्नाला बगल दिली मात्र सिलेक्टर कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक एसओपी तयार करण्यात आली आहे अशी माहिती दिली. 

काय म्हणाले अजित आगरकर : 

पत्रकार परिषदेत आगरकरला विचारण्यात आले की, टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आत बीसीसीआयला त्याच खेळाडूंसाठी नवे प्रवासी धोरण लागू करण्याची गरज का पडली? यावर आगरकरने म्हटले की, "मला मते प्रत्येक संघाचे काही नियम असतात. ही शाळा नाही. ही शिक्षा नाही. जेव्हा तुम्ही राष्ट्रीय संघासाठी खेळता तेव्हा तुम्ही त्या नियमांचे पालन करता. हे परिपक्व खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय खेळात ते स्वत:चा सुपरस्टार आहेत, पण शेवटी तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहात".