थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक

Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 6, 2023, 12:17 PM IST
थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक title=
(फोटो सौजन्य - Reuters)

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच सायबर गुन्ह्यामध्ये (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. सामान्यांपासून ते सेलिब्रिटिंपर्यत सर्वांनाच सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केले आहे. अशातच सरकारी अधिकाऱ्यांची देखील सायबर गुन्हेगारींनी (Cyber Fraud) फसवणूक केल्याच समोर आलं आहे. अशातच पुण्यात (Pune News) जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी राजस्थानातून (Rajasthan) एकाला अटक केली आहे. आरोपीच्या नावामुळे हे प्रकरण सध्या फार चर्चेत आलं आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून एका पत्रकाराकडून 70 हजार रुपये उकळण्यात आले होते. याप्रकरणी फिर्यादी पत्रकाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी राजस्थानातून आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीला पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली होती. जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफमध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किमतीत विकत असल्याचे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपीने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी 70,000 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ही रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करुन घेतले. मात्र आरोपीने फर्निचर पाठवले नाही. त्यानंतर हे सगळं प्रकरण बोगस असल्याचे कळताच फिर्यादीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील अलवर या ठिकाणी पथक पाठवून राजस्थानच्या बहादुरपूर गावातून शाहरुख खान नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यांकडे कसून चौकशी केली असता शाहरुखने देशातील अनेक आयपीएस आणि अधिकाऱ्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुक अकाऊंट बनवून लाखो रुपये उकळले असल्याची कबुली दिली आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.