Reason behind Feel Sleepy While Studying:आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ नेहमी देत असतात. पण काही लोकांना रात्री नीट झोप झाली असेल तरी पुस्तक वाचताना किंवा अभ्यास करताना खूप झोप येते. पुस्तक वाचल्याने ज्ञानात भर पडते, माहिती मिळते असे अनेक फायदे मिळतात. पण नेमके पुस्तक वाचायला किंवा अभ्यासाला बसले की डोळे बंद होऊ लागतात. असे झाल्याने एखादे काम किंवा अभ्यास पूर्ण होत नाही. त्यामुळे या समस्येचे निराकरण करणे खूप गरजेचे आहे.
1. डोळ्यांचा आणि मेंदूचा थकवा
अभ्यास करताना डोळे सतत एका ठिकाणी एकाग्र होण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर जास्त ताण येतो आणि ते थकायला लागतात. त्याचबरोबर, मेंदू नवनवीन माहिती साठवण्याचं काम करत असतो. त्यामुळे तोही थकतो, आणि वाचणाऱ्याला झोप येऊ लागते.
2. आरामदायी अवस्था आणि झोप
पुस्तक वाचताना आपलं शरीर बहुतेक वेळा आरामदायी अवस्थेत असतं. डोळे आणि मेंदू सक्रिय असले तरी शरीराच्या इतर भागांना आराम मिळतो. त्यामुळे शरीर झोपेचे संकेत देते. अशा वेळी आपल्याला थकल्यासारखं वाटायला लागतं. जेव्हा शरीराला आराम मिळतो, तेव्हा झोप येणे नैसर्गिक आहे. मग आपण पुस्तक वाचत असू किंवा प्रवास करत असू, ही प्रक्रिया सारखीच असते. डोळे आणि मेंदू काम करत असतात, पण बाकी शरीर आरामाच्या मुद्रेत असते, त्यामुळेच लांब प्रवासात किंवा गाडीत बसल्यावर झोप येते. अभ्यासाबाबतीतदेखील तसेच आहे. वाचताना डोळे आणि मेंदू काम करत असतात. अशा वेळी शरीर आरामाच्या मुद्रेत असल्याने खूप झोप येते.
1. योग्य प्रकाशात अभ्यास करा: कमी प्रकाशात वाचल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि झोप लागते. म्हणून नेहमी चांगला प्रकाश असलेल्या ठिकाणी बसून वाचा.
2. शुद्ध हवा असलेल्या ठिकाणी वाचा: अशा ठिकाणी बसून अभ्यास करा जिथे मोकळी आणि शुद्ध हवा असेल. यामुळे शरीर आणि मन तरतरीत राहील.
3. ब्रेक घ्या: सलग खूप वेळ अभ्यास केल्याने थकवा येतो. त्यामुळे प्रत्येक 30-45 मिनिटांनी थोडा ब्रेक घ्या.
4. संतुलित आहार घ्या: पोषणयुक्त आहार घेतल्याने शरीर आणि मेंदू निरोगी राहील आणि अभ्यासात मन लागेल.
5. पुरेशी झोप घ्या: रात्री व्यवस्थित झोप घेतल्यास दिवसा शरीर उत्साही राहील आणि अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित होईल.
6. चहा किंवा कॅफी: झोप घालवायची असेल तर चहा किंवा कॉफी पिणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे थेट मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. आणि झोपही पळून जाते. पण खूप जास्त चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, हेही लक्षात ठेवा.
हे ही वाचा: झाडांची वाढ खुंटलीये, किड्या-मुंग्या लागल्यात; फक्त 10 रुपयांची ही वस्तू वापरा, रोप फुलांनी बहरेल
याप्रकारे योग्य सवयी अंगीकारल्यास अभ्यास करताना येणारी झोप टाळता येईल आणि तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकाल.