Dhananjay Munde On Walmik Karad: बीडचं पालकमंत्रिपद न मिळाल्यानंतर काही तासांमध्येच मंत्री धनंजय मुंडे रविवारी पहाटे शिर्डीमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गैरहजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांसाठी धनंजय मुंडे हजर होते. धनंजय मुंडे 'हॉटेल सन अँड सँड'मधून राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला जाण्यासाठी बाहेर पडले त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस अगदी बीडच्या पालकमंत्रिपदापासून ते वाल्मिक कराडपर्यंत अनेक प्रश्नांना धनंजय मुंडेंनी उत्तरं दिली.
शिर्डीमध्ये दाखल झाल्याबद्दल बोलताना धनंजय मुंडेंनी, "साईबाबांच्या दर्शनाने नवी उर्जा मिळते. त्याच ऊर्जेतून आम्ही काम करतोय," असं म्हटलं. यानंतर पत्रकारांनी बीडच्या पालकमंत्रिपदी अजित पवारांचं नाव जाहीर झालं असून तुम्हाला डावललं गेल्याची चर्चा आहे असं विचारलं असता धनंजय मुंडेंनी, "बीडची सध्याची स्थीती पाहून मीच दादांना विनंती केली की बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा ही माझी भावना आहे," असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List
विरोधकांनी तुम्हाला बीडचं पालकमंत्रिपद मिळून नये म्हणून विरोध केल्याने तुम्हाला संधी दिली नाही, असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडेंनी, "त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय आहे हे अधिक महत्वाचं आहे. मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली की बीडची जबाबदारी आपण घ्यावी. विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा. मात्र मला आत्ता यावर काही बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही," असं सूचक विधान केलं. पुढे बोलताना धनंजय मुंडेंनी, "आत्ताची परिस्थीती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचंय तर करा मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका," अशी विनंती आरोप करणाऱ्यांना केली.
नक्की वाचा >> पालकमंत्री नक्की काय काम करतात? त्यांना काय अधिकार असतात? हे पद इतकं महत्त्वाचं का?
तुमचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत, असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मोजून चार शब्दांमध्ये उत्तर दिलं. वाल्मिक कराडशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी, "हे सगळं खोटं आहे," असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> 'पाया पडून अजितदादांना सांगत होतो की तुम्ही...'; पहाटेच्या शपथविधीबद्दल मुंडेंचा गौप्यस्फोट
त्यानंतर अन्य एका पत्रकाराने, सारंगी महाजनांच्या आरोपांवर काय म्हणाल? असं विचारलं असता त्यावर धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा 'हे सर्व काही खोटं आहे' असं मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. सारंगी महाजन यांनी मुंडेंवर जमिनीच्या व्यवहारांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता.