मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात...

Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 6, 2023, 11:45 AM IST
मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात...  title=
Mumbai local news Central Railway To Introduce Women's powder rooms at station

Mumbai Local Train News: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस लोकलला तुडुंब गर्दी असते. अनेकदा तर सकाळी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमध्ये चढायलाही जागा उरत नाही आणि जरी जागा मिळाली तरी गर्दीत कसे तरी उभे राहायला मिळते. अशातच एखाद्या मिटिंगसाठी किंवा ऑफिसमध्ये जायचे असल्यास त्याच अवतारात जावे लागते. महिलांना अशावेळी खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 

महिलांच्या सुविधांसाठी मध्य रेल्वेने 7 स्थानकांवर महिला पावडर रुम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुममध्ये महिला मेकअप किंवा तयार होण्याव्यतिरिक्त मेकअपसंबंधी सामानही खरेदी करु शकणार आहेत. महिलांसाठी शौचालय, वॉशबेसिन, आरसा, ड्रेसिंग टेबलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. फक्त 10 रुपयांत महिलांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वेने महिलांसाठी संपूर्ण वर्षभराचा प्लानही तयार केला आहे. 365 रुपये भरुन संपूर्ण वर्षभर रुमचे सब्स्क्रिप्शन खरेदी करु शकतात. सध्या ही सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनन्स, घाटकोपर, मुलुंड, ठाणे,मानखुर्द आणि चेंबूर स्थानकात उपलब्ध आहे. 

दरम्यान, रेल्वेने सात स्थानकांत ही सौंदर्य प्रसाधनगृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. स्वछतागृहांबरोबरच कॉफीशॉप, शिशुंच्या स्तनपानासह डायपर बदलण्यासाठी स्वतंत्र जागा या सुविधादेखील महिलांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. मोफत वायफाय, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि शहरातील अन्य सौंदर्य प्रसाधनगृहांचा शोध घेण्यासाठी अॅप अशा सुविधा महिला प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

स्थानकातील प्रवाशांना अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी प्रत्येक स्थानकांवर 200 चौरस फुटांची जागा संबंधितांना देण्यात येणार आहे. महिला पावडर रुमसाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदाराला तसे आदेश देण्यात आले आहेत. दोन महिन्यांच्या आत सौंदर्य प्रसाधनगृह उभारणे बंधनकारक असणार आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

लोकल ट्रेनमधून लाखो महिला प्रवासी प्रवास करतात. या महिलांच्या सुविधांसाठी रेल्वे पावडर रुम सुरू करत आहे. ही सुविधा साधारणतः मॉलमध्ये देण्यात येते. मात्र, रेल्वे स्थानक परिसरात पुरेसी सुविधा नसल्यामुळं महिला जवळच्या मॉलमध्ये किंवा स्टोअरमध्ये तयार होण्यासाठी जातात. मात्र, आता स्टेशनवर उतरल्यावर लगेचच ही सुविधा मिळाल्यामुळं महिला प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे. या रुममधील स्वच्छतागृह वापरण्याची मुभा फक्त महिलांना आहे. मात्र, तिथे असलेल्या दुकानांतून पुरुषदेखील खरेदी करु शकतात. 

महिला पावडर रुमच्या माध्यमातून रेल्वेने प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करत आहे. त्याचबरोबर या माध्यमातून रेल्वेची कमाईदेखील होणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी रेल्वेला 39.48 लाखांचा महसूल प्राप्त होण्याची शक्यता आहे. महिला प्रवाशांना स्वच्छतागृहांबरोबरच विशेष रुमदेखील मिळणार आहे.