Saif Ali Khan Attack Bangladeshi Arrested: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये शनिवारी रात्री उशीरा ठाण्यातील कासारवडवली येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी पत्रकारपरिषदेमध्ये ही माहिती दिली. तसेच हा आरोपी बांगलादेशचा असल्याची शक्यताही पडताळून पाहत असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. सदर आरोपी बांगलादेशचा असून पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो भारतात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरुन थेट शरद पवारांच्या पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
सैफवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला अटक केली आहे. आरोपी बांगलादेशचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याच्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, "बांगलादेशींना मदत करणारे बडी धेंडं आहेत. यामागे मोठे रॅकेट आहे. सिस्टीमच्या आत राहून बांगलादेशींना कागदपत्रे पुरवले जातात. यात शासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचाही सहभाग आहे," असा खळबळजनक आरोप केला. तसेच पुढे बोलताना, "बांगलादेशींना बळ देणारे काही राजकीय नेते व त्यांचे अड्डे समोर येतील. तसेच अशी मदत करणारे पक्ष कोणते आहेत त्यांची नावंही समोर येतील," असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.
थेट उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. "ठाण्याचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई आज सैफवरचा हल्लेखोर बांगलादेशी आहे हे समजल्यावर गप्प का?" असा सवाल नितेश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधताना केला आहे. तसेच या बांगलादेशींबद्दल बोलताना, "भंगारविक्रेते, फूड डिलीव्हरीच्या माध्यमातून बांगलादेशी घरांपर्यंत पोहोचतात. शून्य बांगलादेशी हे आमच्या सरकारचं टार्गेट आहे. महाराष्ट्रात एकही बांगलादेशी ठेवणार नाही. बांगलादेशी सापांना दूध पाजणा-यांचाही मुखवटा फाडणार," असा इशाराही नितेश राणेंनी दिला.
नक्की वाचा >> 'वाल्मिक कराड माझ्या जातीला पण...'; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट! म्हणाले, 'संतोषची बायको...'
"बांगलादेशींना आसरा देणारे, कागदपत्र देणारे, हिरव्या सापांना दूध पाजणारे हेच वोट जिहाद करणारे आहेत. भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र करायचा हा अनेकांचा अजेंडा आहे," असं विधान नितेश राणेंनी केलं. "मुंबईत बांगलादेशींचे अनेक अड्डे आहेत. अशा ठिकाणांवर लक्ष ठेवले जात आहे. लवकरच हे अड्डे उध्वस्त केले जातील," असंही नितेश राणेंनी सांगितलं.
नक्की वाचा >> Saif Ali khan Attack: करीनाचा खळबळजनक जबाब! हल्ला चोरीच्या उद्देशाने नाही? म्हणाली, 'मी मुलांच्या..'
दरम्यान, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ज्या ठिकाणावरुन सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली त्या कामगार वस्तीला आज भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी, "या ठिकाणी आलोय कारण मला माहिती मिळाली की हा बांगलादेशींचा अड्डा आहे. या वस्तीत ताबडतोब पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करायला हवं. आज माझी ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली आहे. या कंट्रक्शन साइटवर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार आहेत. आरोपी इथेच राहत होता आणि याच लोकांनी त्याला आश्रय दिला होता असा माझा संशय आहे," असं म्हटलं.
नक्की वाचा >> 'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया
"बांगलादेशींबद्दल मी आणि देवेंद्र फडणवीस गेल्या दोन महिन्यांपासून बोलत होतो आजच्या घटनेने हे सिद्ध झालं आहे. आम्ही ज्यावेळेला बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दल बोलतो त्यावेळी राहुल गांधींपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेपर्यंत सगळे आरडा ओरड करतात. आज ठाकरे परिवाराने प्रतिक्रिया दिली की ही सरकारची निष्फळता आहे. पण पश्चिम बंगालचा सरकार तिकडे पंचिंग करून देत नाही. तिकडून हे आधार कार्ड घेऊन येतात म्हणून ठाकरे परिवार असो की राहुल गांधी यांच्यासाठी हा व्होट जिहाद आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना यांना भारतीयत्त्व प्रमाणपत्र, आधारकार्ड, मतदारयादीत नाव यामुळे देशात विघातक घटना होत आहे. सध्या कंट्रक्शन साइटवर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये बांगलादेशी यांना काम दिले जात आहे. सर्व ठिकाणच्या कंट्रक्शन साईटवर कोंबिंग करावं यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे," असंही सोमय्या म्हणाले.