Jammu Kashmir Children Mysterious Deaths: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका रहस्यमय आजाराने कहर केला आहे, डिसेंबर २०२४ च्या सुरुवातीपासून १६ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३८ जणांना त्याची लागण झाली आहे. इतकंच नव्हे तर गावांगावात भूत-प्रेत आणि जादूटोण्याच्या अफवादेखील रंगू लागल्या आहेत. या आजाराच्या मुळाशी जाण्यासाठी एसआयटीचे पथकाची नेमणूक करावी आणि तपासाला सुरुवात केली जात आहे. या एसआयटीच्या पथकात पोलिस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारीदेखील आहेत. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी यांनी शुक्रवारी जम्मूच्या शालामार रुग्णालयाचा दौरा करत पीडित कुटुंबीयासोबत चर्चा केली.
उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू कशामुळं होत आहेत. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राजौरी गावातील बडाल गावांत आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येत आहे. तपास यंत्रणांना या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कोणी जाणूनबुजून असा प्रकार करत असेल तर त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी आरोग्य आणि पोलिस विभाग यांना राजौरी जिल्ह्यातील बदहाल गावात झालेल्या रहस्यमय मृत्यूंची चौकशी व्हावी असे आदेश दिले आहेत. गावातील स्थितींवर चर्चा करण्यासाठी एका उच्चस्तरिय बैठकदेखील बोलवण्यात आली होती. आत्तापर्यंत प्रभावीत ठिकाणी 3 हजाराहून अधिक रहिवाशांच्या घरी जावून सर्वेक्षण केले आहे. यावेळी पाणी, जेवण आणि अन्य साहित्यांचे नमुने घेण्यात आले असून त्याची तपासणी होणार आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, भारतीय सैन्य आता या भागात तैनात करण्यात आले आहे, जे स्थानिक रहिवाशांना अन्न, पाणी आणि निवारा यासारख्या आवश्यक वस्तू पुरवत आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बुधल गावात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी या गावातील मृत्यू हे न्यूरोटॉक्सिनमुळे झाले आहेत. राजौरी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) प्राचार्य डॉ. ए.एस. भाटिया आणि बुधलचे आमदार जावेद इक्बाल चौधरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली.
मृतांमध्ये काही लक्षणे समान दिसून आली आहेत. डॉ. भाटिया म्हणाले की, सर्व मृतांमध्ये मेंदूला सूज येणे किंवा एडेमा ही एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे. त्यांनी बाधित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या उपचारांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.