Jio Coin: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची क्रिप्टोमध्ये एन्ट्री? जिओ कॉइनची चर्चा जोरात

Jio Coin:  जिओने अलीकडेच इंटरनेट तंत्रज्ञान कंपनी पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारीची घोषणा केली. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 19, 2025, 02:20 PM IST
Jio Coin: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची क्रिप्टोमध्ये एन्ट्री? जिओ कॉइनची चर्चा जोरात title=
जिओ कॉइन

Jio Coin: कमी वेळात जास्त नफा मिळवून देण्यासाठी जगभरातील गुंतवणूकदार क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक खूपच जोखमीची असते. क्रिप्टोतील गुंतवणूक भारतात कायदेशीर नाही. असे असले तरी अनेक भारतीयांना याबद्दल उत्सुकता असते. अनेकजण याबद्दल संशोधन करताना दिसतात. आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ प्लॅटफॉर्म क्रिप्टोमध्ये एन्ट्री करणार का? अशा चर्चा वेगाने पसरु लागल्या आहेत. 

जिओने अलीकडेच इंटरनेट तंत्रज्ञान कंपनी पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारीची घोषणा केली. अंबानींच्या टेलिकॉम कंपनीने हे जाहीर केल्यापासून JioCoin ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. जिओ कॉइनचे यूजर्स त्याचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. अनेक यूजर्स ट्विटरवर JioCoin चे फोटो शेअर, रिट्वीट करताना दिसतायत. असे असले तरी जिओ कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बिटनिंगचे सीईओ काशिफ रझा यांनीही यासंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. जिओकॉइनचा वापर मोबाईल रिचार्ज किंवा रिलायन्स गॅस स्टेशनवर खरेदीसारख्या सेवांसाठी केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जातोय.

जिओने पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारी केल्यानंतर बाजारात विविध चर्चा सुरु झाल्या. ब्लॉकचेन आणि वेब 3 क्षमतांसह त्यांच्या ऑफरिंग्ज वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. असे असले तरी अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओकडून जिओ कॉइन किंवा त्याच्या वापराबद्दल कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पॉलिगॉन लॅब्ससोबत भागीदारी 

रिलायन्स इंडस्ट्रीजची तंत्रज्ञान उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सने अलीकडेच भारतात वेब३ आणि ब्लॉकचेन क्षेत्रात एन्ट्रीसाठी पॉलीगॉन प्रोटोकॉलची डेव्हलपर शाखा असलेल्या पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे आता जिओ यूजर्सेना नवीन, नाविन्यपूर्ण आणि संभाव्य फायदेशीर सेवा मिळू शकतो. याद्वारे जिओ यूजर्सना वाढीव गोपनीयता आणि वैयक्तिक डेटावरील नियंत्रण यासारखे फायदे मिळू शकतात. 

जिओ प्लॅटफॉर्मच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या काही विद्यमान सेवांमध्ये वेब३ क्षमता जोडणे, पॉलीगॉनच्या अत्याधुनिक ब्लॉकचेन सोल्यूशन्सचा वापर करून जिओच्या विद्यमान 450+ दशलक्ष ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण वेब३ सेवा तयार करणे हादेखील यामागचा हेतू आहे. ब्लॉकचेन, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिजिटल मालमत्ता आणि टोकन्स, ज्यात क्रिप्टोकरन्सी, सेंट्रल बँक डिजिटल चलने (CBDCs) आणि NFTs यांचा समावेश आहे, यासारख्या नवीन तंत्रज्ञानात Web3 चा सपोर्ट मिळतो.

पॉलीगॉन लॅब्स ही एक सुप्रसिद्ध क्रिप्टो आणि ब्लॉकचेन प्लेअर आहे आणि ही भागीदारी जिओला क्रिप्टो उद्योगात प्रवेश करण्यास सक्षम करू शकते. त्यामुळे मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कंपनीसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण आहे. पॉलीगॉन लॅब्ससोबतचा संबंध हा जिओच्या डिजिटल उत्कृष्टतेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला Web3 च्या अमर्याद शक्यतांचा शोध घेण्यास आणि आमच्या युजर्सना अद्भूत डिजिटल अनुभव देण्यास आम्ही उत्सूक आहोत, अशी प्रतिक्रिया जेपीएलचे सीईओ किरण थॉमस यांनी यावेळी दिली.