'पाया पडून अजितदादांना सांगत होतो की तुम्ही...'; पहाटेच्या शपथविधीबद्दल मुंडेंचा गौप्यस्फोट

Dhananjay Munde Comment On Oath Ceremony: पहिल्या दिवशी पक्षाच्या शिबिराला अनुपस्थित राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी केलेल्या भाषणात धनंजय मुंडेंकडून मोठा गौप्यस्फोट

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 19, 2025, 12:34 PM IST
'पाया पडून अजितदादांना सांगत होतो की तुम्ही...'; पहाटेच्या शपथविधीबद्दल मुंडेंचा गौप्यस्फोट title=
शिर्डीतील भाषणात केलं विधान

Dhananjay Munde Comment On Oath Ceremony: बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांकडे सोपवण्यात आल्यानंतर शिर्डीमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली आहे. पहाटे चार वाजताच धनंजय मुंडे शिर्डीत दाखल झाल्यानंतर आज त्यांनी पक्षाच्या शिबिरात जाहीर भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये 'बीडचा बिहार कोणी केला?' असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा उल्लेखही धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात केला. 

संतोष देशमुख प्रकरणावर मुंडेंचं भाष्य

"मला काही लोक टार्गेट करत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर (अजित पवारांवर) आली आहे. फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. आम्ही शीव शाहू फुले यांच्या विचाराचे आहात का? असे प्रश्न आम्हाला विचारले जातात मात्र आपला एकमेव पक्ष आहे जो शाहू फुलेंच्या विचाराने चालतो," असं धनंजय मुंडेंनी भाषणात म्हटलं आहे. पुढे बोलताना धनंजय मुंडेंनी, "बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घुण हत्या झाली. त्याचं समर्थन कोणीच करु शकत नाही.ज्यांनी केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. त्या 5-8 गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे," असंही म्हटलं आहे.

माझ्या देहावरील अग्नीचा धूरदेखील...

बीडमधील गुन्हेगारी घटनांबद्दल बोलताना धनजंय मुंडेंनी, "बीडचा बिहार झाला, कोणी केला?" असा सवाल विचारला आहे. "12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केल जातं आहे," अशी खंत धनंजय मुंडेंनी भाषणादरम्यान व्यक्त केली. "माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यामागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूरदेखील त्याची परतफेड करु शकत नाही," असं भावनिक विधानही धनंजय मुंडेंनी भाषणात केलं. 

नक्की वाचा >> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List

टीका करायची ठरलं तर...

"जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शंत्रूना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. टीका करायची ठरलं तर माझ्यासारखी टीका कोणी करु शकत नाही. टीका करायची वेळ आली तर मी टीका करू शकतो. माझ्यासारखी टीका कोणालाही करता येणार नाही. आपल्याला नव संकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्यांवर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे अविश्वास दाखवून काय होणार? दादांना शब्द देतोय मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. उद्या माझ्यावर पाँडिचेरीची जरी जबाबदारी दिली तरी मी पूर्ण जबाबदारीने पार पडणार," असं धनंजय मुंडे म्हणाले.

नक्की वाचा >> पालकमंत्री नक्की काय काम करतात? त्यांना काय अधिकार असतात? हे पद इतकं महत्त्वाचं का?

पहाटेच्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट

धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख केला. "पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं," असं धनंजय मुंडे भाषणात म्हणाले.