प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे त्यांच्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असतात अशातच माणगावात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत कामाला लागा असा सल्ला देत आमदार भरत गोगावले यांनी माणगाव शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आमच्यावर, संघटनेवर, मख्यमंत्री यांच्यावर विश्वास असला तरच आमच्या सोबत रहा. विश्वास नसेल, कोणी काही देत असेल तर जा असा सल्ला भरत गोगावले यांनी दिला आहे. आम्ही चुकत नसू तर आमच्या सोबत रहा, असेही भरत गोगावले यांनी ठणकावून सांगितलं. मतदार नाव नोंदणीची आकडेवारी सांगत आपण किती नाव नोंदवली याचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला देखील माणगाव येथील पदाधिकारी मेळाव्यात भरत गोगावले शिवसैनिकांना दिला आहे.
"जर आमच्यावर, संघटनेवर, मुख्यमंत्र्यांवर विश्वास असला तर तुम्ही आमच्याबरोबर राहा. तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर राहण्याचे कारण नाही. तुम्हाला जर कोणी काय देत असेल, घेत असेल, काही मतलब असेल तर तिकडे जा. आम्ही त्याबद्दल नाही सांगणार. आम्ही चुकत असू, तुमची कामे होत असतील तर वरिष्ठांकडे सांगा. आम्ही एवढी कामं करत आहोत की पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काम सांगायची वेळ येणार नाही. कामचं उरणार नाही अशा प्रकारचे आपण नियोजनबद्ध काम करतो आहोत. मग तुमच्यावर जवाबदारी काय? मतदार नोंदणीची. किती लोकांनी मतदार नोंदणी केली? मी आढावा घेतला आपल्या महाड मतदारसंघामध्ये आतापर्यंत साडेतीन हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्यामध्ये प्रत्येकाने आत्मचिंतन करावं की मी माझ्या गावातील किती मतांची नोंद केली. पुढारपणा करता ना. मग एक दिवस तहसीलदार कार्यालयात जा, असा सल्ला आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला.
उदय सामंतांवर कार्यकर्त्यांची उघड नाराजी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना रायगडच्या शिवसैनिकांनीच घरचा आहेर दिला होता. रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. उदय सामंत हे राज्याचे उद्योग मंत्री आहेत पण जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. इथं अनेक उद्योग आहेत परंतु साधा रोजगार मेळावा घेतला नाही. पालकमंत्री असून देखील जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी ते कुठलेच प्रयत्न करत नाही. शिवसैनिकाशी संवाद साधत नसल्याचा आरोप शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला होता.