Donald Trump Contraceptive Pills: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष या देशानं वेधलं. जागतिक स्तरावर महासत्ता ठरलेल्या या देशात ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच एकाएकी काही विचित्र घटनांनी लक्ष वेधलं.
मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा खप एकाएकी वाढला आहे. औषधांच्या दुकानांमधून ग्राहक सतत गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी करत आहेत. यामागे एक धक्कादायक कारणंही समोर आलं आहे. येत्या काळात अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी आणली जाऊ शकते या भीतीनं येथील नागरिक या गोळ्या खरेदी करताना दिसत आहेत.
अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून आणि प्रामुख्यानं राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अमेरिकेतील नागरिकांनी गर्भपाताशी संबंधिक अधिकारांवर गंभीार परिणाम होणार असल्यासंदर्भात भीती व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
गार्डियनच्या वृत्तानुसार मेल ऑर्डर गर्भपात गोळ्या पुरवणाऱ्या Aid Access ला अवघ्या 12 तासांमध्ये गोळ्यांसाठीच्या 5000 मागण्या आल्या. यापूर्वी असं कधीच झालं नसल्याचं कंपनीकडूनही स्पष्ट करण्यात आलं होतं. फक्त गर्भनिरोधक गोळ्याच नव्हे, तर आपातकालीन गर्भनिरोधक (emergency contraception) गोळ्यांच्या मागणीतही वाढ झाल्याची बाब अमेरिकेत पाहायला मिळत आहे. साधारण 300 टे 625 टक्क्यांपर्यंत ही मागणी वाढल्यामुळं अमेरिकेत सध्या एक वेगळीच आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता जागतिक घडामोडींच्या विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
गर्भपाताविषयी डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही वक्तव्यांचा आधार घेतला असता सध्या अमेरिकेतील नागरिकांमध्ये भीतीचा माहोल आहे. येत्या काळात देशात गर्भपाताच्या गोळ्यांचे नियम बदलून त्यांच्या वितरणातही प्रतिबंध लागू केले जाण्याची चिंता नागरिकांच्या मनात घर करताना दिसत आहे. ज्यामुळं अमेरिकेत एकाएकी गर्भपाताच्या गोळ्य़ांची मागणी आणि खप वाढला आहे.