'गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,' महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला

गंगेत स्नान करण्यावरुन खरगे म्हणाले आहेत की, "गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो".  

शिवराज यादव | Updated: Jan 27, 2025, 06:52 PM IST
'गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,' महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला title=

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपा नेत्यांच्या महाकुंभ स्नानावरुन विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "गंगेत डुबकी घेऊन काय गरिबी संपत नाही". भाजपा-आरएसएसवर निशाणा साधत खरगे म्हणाले की, "ते म्हणतात प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधू नका. पण तेच लोकांना असं करण्यासाठी उसकवत असतात".

महू येथे बोलताना खरगे यांनी सांगितलं की, "गंगेत डुबकी लावण्यासाठी भाजपा नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. गंगेत डुबकी लगावून गरिबी कमी होणार नाही. माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो". पुढे ते म्हणाले की, "आरएसएस-भाजपा देशद्रोही आहे. गरिबी-बेरोजगारीपासून मुक्तता हवी असेल तर संविधानाची सुरक्षा करावी लागेल".

खरगे म्हणाले आहेत की, "आज भाजपा-आरएसएसचे लोक काँग्रेसबद्दल वाईट बोलत आहेत. पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळं काही केलं. हे लोक स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांसह होते. इंग्रजांची चाकरी करत होते. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचं काही योगदान नाही. यामुळे तुम्हाला एकजूट होऊन या लोकांना धडा शिकवावा लागेल आणि आपल्या अधिकारांचं रक्षण करावं लागेल".

'तुम्हा सर्वांना बाबासाहेबांप्रमाणे बनावं लागेल'

काँग्रेस अध्यक्ष पुढे म्हणाले की, "महूच्या जमिनीवरच बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. त्यांनी देशातील दलित आणि वंचितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचं काम केलं. जेव्हा बाबासाहेब एकटे इतकं काम करु शकतात, तर तुम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे झालात तर भाजपा सरकार हादरुन जाईल. तुम्हा सर्वांना बाबासाहेब, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यासारखं व्हायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करायचं आहे. ही लढाई तुमच्या वतीने राहुल गांधी लढत आहेत".

गंगेत डुबकी लगावल्याने गरिबी दूर होते का?

गंगा स्नानावर ते म्हणाले की, "गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो. पण जेव्हा मुलं भुकेने मरत आहेत, शाळेत जात नाहीयेत, मजुरांना मजुरी मिळत नाही आहे तेव्हा हे लोक हजारो खर्च करुन डुबकींची स्पर्धा लावत आहेत. जोपर्यंत टीव्हीत चांगलं येत नाही तोपर्यंत डुबकी मारर राहतात. हे लोक देशाचं भलं होऊ देणार नाहीत".

भाजपाने दिलं प्रत्युत्तर

खरगे यांच्या विधानावर भाजपा खासदार संबित पात्रा म्हणाले आहेत की, "ते दुसऱ्या एखाद्या धर्माबद्दल असं विधान करु शकतात का? सनातन धर्माविरोधात असं वक्तव्य निंदनीय आहे. काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण द्यावं. हे तेच खरगे आहेत ज्यांनी म्हटलं होतं की, आम्ही सत्तेत आल्यास सनातनला संपवून टाकू".