Uday Samant: झी 24 तासच्या उद्योग संम्मेलन कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. उद्योग करारांसाठी दावोसलाच दौरा का? भारतात असे करार होऊ शकत नव्हते का? असे अनेक प्रश्न दावोस दौऱ्यावरुन विचारले जातात. अशा अनेक प्रश्नांना उदय सामंतांनी उत्तरे दिली.
दावोसला आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत करार केले. यातून बेरोजगारी दूर होणार आहे. दावोसलाच का जाता? असा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी सर्व कंपन्यांचे मालक, अनेक पंतप्रधान, मुख्यमंत्री असतात. प्रत्येकाच्या विचारांची देवाणघेवाण होते. कोणता देश उद्योजकांना आकर्षित करु शकतो? हे कळते. आम्ही पारदर्शकपणाने दावोसला गेलो आणि विक्रमी गुंतवणूक आणण्यास यशस्वी ठरलो. दावोसला 15 लाख 70 हजार कोटींचे करार आम्ही केले. यामुळे 15 लाख रोजगार तयार होणार आहेत. मुकेश अंबानींची रिलायन्स, जिंदाल, अमेझॉन या फक्त देशातच नव्हे तर जगभरात काम करतात, असे सामंत म्हणाले.
2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली दावोसला विक्रमी करार करण्याची प्रथा आम्ही सुरु केली. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ती सुरु ठेवली असल्याचे सामंत म्हणाले. आम्ही कॅबिनेट बैठका घेतल्या आहेत. तरी काही कारारांवर आक्षेप घेतले जातात. आमच्यावर आक्षेप घेणारे अंबानींच्या व्हिडीओवर आक्षेप घेऊ शकतात का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
भारतातल्या कंपन्यांसोबत दावोसला जाऊन करार का?असे करार भारतात होऊ शकत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, 'त्या प्लॅटफॉर्म, एमओयूवर आक्षेप घेण्यापेक्षा आम्ही गुंतवणूक आणण्याचा निर्णय घेतलाय त्यावर विरोधक म्हणून वॉच ठेवा. तेव्हा आमच्याही कामाला आणखी वेग येईल,' असे सामंत म्हणाले. आम्ही उद्योजकांना जागा देतो की नाही ते पहा. इन्सेंटीव्ह देतो की नाही हे पाहा. चांगली चर्चा करा. पण टीका करायची म्हणून करु नका, असे उदय सामंत विरोधकांना उद्देशून म्हणाले. झालेल्या एमओयूची अंमलबजावणी होते की नाही, हे माध्यमांनीदेखील पाहावं, असे आवाहन त्यांनी केले.