'त्याला एक वर्ष झालं पण अजून...', खेळाडूने BCCI ला गौतम गंभीरबद्दल स्पष्टच सांगितलं, 'फार वाईट गोष्ट...'

इंग्लंड दौरा होईपर्यंत गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) प्रशिक्षकपद सुरक्षित राहील अशी आशा आहे. पण एकदा तो संपल्यानंतर कोणतीही खात्री देता येणार नाही.   

शिवराज यादव | Updated: Jan 27, 2025, 05:42 PM IST
'त्याला एक वर्ष झालं पण अजून...', खेळाडूने BCCI ला गौतम गंभीरबद्दल स्पष्टच सांगितलं, 'फार वाईट गोष्ट...' title=

माजी क्रिकेटर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली, त्यावेळी क्रिकेटचाहत्यांना फार अपेक्षा होत्या. आयपीएलमध्ये कोलकाता संघाला विजेतेपद पटकावून दिल्यानंतर भारतीय संघासाठीही तो अशीच काहीतरी कामगिरी करेल असा विश्वास सर्वांना वाटत होता. पण टी-20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या राहुल द्रविडकडून प्रशिक्षकपद घेतल्यानंतर आतापर्यंतचा काळ गौतम गंभीरसाठी फार खडतर गेला आहे. श्रीलंकेविरोधातील टी-20 मालिकेतील व्हाईटवॉश वगळता गौतम गंभीरकडे आपल्या कामगिरीबद्दल फारसं काही दाखवण्यासारखं नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील पराभवामुळे गौतम गंभीरच्या कामगिरीवर टीका केली जात आहे. 

गौतम गंभीरसाठी आता पुढील काळ जास्त आव्हानात्मक असणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आता चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि नंतर इंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये जर भारतीय संघ चांगली कामगिरी करु शकला नाही तर मात्र त्याच्या कामगिरीची चाचपणी होईल. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पिअन्स ट्रॉफी सुरु होणार आहे. यावेळी गौतम गंभीरची खरी परीक्षा होणार आहे. भारताने 2013, 2017 मधील चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली आहे. यामुळे जर भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफी गमावली तर गौतम गंभीरच्या हाती फार काही नसणार आहे. 

पण भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राच्या मते जर चॅम्पिअन्स ट्रॉफी भारताने गमावली तरी गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाला फारसा धक्का लागणार नाही. गंभीरने किमान एक वर्ष पूर्ण केल्यानंतरच बीसीसीआयने त्याच्या कामगिरीचे आणि चुकांचे सखोल मूल्यांकन करावे, असं मत त्याने मांडलं आहे. गंभीरला गेल्या वर्षी जुलैमध्ये अधिकृतपणे संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यामुळे जूनमध्ये इंग्लंड कसोटी सुरू होत असल्याने, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या शेवटी बीसीसीआय त्याच्या कामगिरीचा आढावा घेईल असं चोप्राचं म्हणणं आहे. 

'इंग्लंड दौरा पूर्ण होईपर्यंत बीसीसीआय गंभीरला काहीच म्हणणार नाही'

"आणखी एक इंग्लंड दौरा करायचा आहे. तोपर्यंत बीसीसीआय त्याला काहीही सांगेल असं मला वाटत नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर, त्याला संघाची सूत्रे हाती घेऊन एक वर्ष होईल. तुम्हाला एका वर्षाच्या आत संघात बदल करणं अपेक्षित होतं. मग त्याने ते कसं केलं? त्याने कोणते खेळाडू तयार केले? संघाची कामगिरी सुधारली आहे का? याचा आढावा घेता येईल," असं आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं.

"एखाद्याच्या कामगिरीचा आढावा घेताना किमान एक वर्षांची कामगिरी पाहिली पाहिजे. तुम्हाला किमान 12 महिने मिळायला हवेत. त्यामुळे मला वाटतं चॅम्पिअन्स ट्रॉफीपेक्षा इंग्लंडचा दौरा महत्त्वाचा आहे. त्याच्या आधारेच गौतमचा पॅरामीटर ठरवला जाऊ शकतो. यातून वाईट गोष्ट होणार नाही. तुम्ही फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीचा आढावा घेता, त्याचप्रमाणे प्रशिक्षकांसाठीही करा," असं चोप्रा पुढे म्हणाला.