Maharashtra Guillain Barre Syndrome : पुण्यात वेगाने वाढत असलेला गिया बार्रे आजार महाराष्ट्रात झपाट्याने पसरत असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यापाठोपाठ सोलापुरातही गिया बार्रे आजाराचे दोन संशयित रुण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णां वाढती सख्या धडकी भरवणारी आहे. पुण्यात एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकुण रुग्णसंख्या आता 101 वर गेलीये. त्यातच सोलापुरातील एका तरूणाच्या मृत्यूने आता महापालिकेसह राज्याची आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. अशातच आता सोलापुरात जीबीएसचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे तो देखील सोलापुराचाच होता.
गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) झालेला महाराष्ट्रातील हा पहिलाच मृत्यू आहे. मृत रुग्ण 40 वर्षांचा होता. त्याला पुण्यात असतानाच जीबीएसची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनास त्रास होत असल्याने या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. मात्र अचानक शनिवारी (25 जानेवारी रोजी) त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात 50 बेडचा वेगळा वॉर्ड तयार करण्यात आलाय...यात 15 बेड महिलांसाठी 15 बेड पुरूषांसाठी तर 15 आयसीयू बेडची सोय करण्यात आलीये. या रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत. तसेच गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या कमी व्हावी, यासाठी महापालिकेला योग्य उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेयत. अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.