यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.   

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2024, 06:41 PM IST
यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...' title=

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडूंनी छोटंसं भाषण करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र यशस्वी जैस्वाले यावेळी भीतीपोटी भाषण केलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आपल्या भाषणात हा खुलासा केला. 

अजित पवारांनी काय सांगितलं?

"यशस्वी 22 वर्षांचा आहे. शिवम दुबे भाषण करायला उठल्यानंतर मला भाषण करायला सांगू नका, मला भाषण जमत नाही म्हणत होता. मी त्याला म्हटलं फक्त नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र करुन ये. पण तो नवखा आहे," असं अजित पवारांनी सांगितलं. 

'असा दिमाखदार कार्यक्रम विधीमंडळात झाला नव्हता'

"क्रिकेटमध्ये याआधी अनेकांनी यश मिळवलं आहे, पण असा दिमाखदार कार्यक्रम विधीमंडळात झाला नव्हता. त्याबद्दल एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर आणि निलम गोऱ्हे यांचे आभार मानत अभिनंदन करतो. 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना आणि ज्याप्रकारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू खेळत होते त्यावरुन कितीतरी क्रीडारसिकांनी मनातून आशा सोडली होती. पण काहीतरी चमत्कार घडेल असं वाटत होतं आणि तो घडला," असं अजित पवारांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले की, "पहिल्या सामन्यापासून आपण यश मिळवत गेलो. प्रत्येक खेळाडूने आपला उत्तम खेळ दाखवला. शेवटच्या वेळी रोहित शर्मा चांगल्या पद्धतीने खेळत असताना आऊट झाला. नंतर विराट आला आणि त्याची बॅट तळपली. शिवम आणि अक्षरनेही चांगली फलंदाजी केली आणि त्यातून आशा उंचावल्या. त्यानंतर बुमराह, पांड्या यांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे. मी 30 ते 35 वर्षात इतकी गर्दी मरीन ड्राईव्हला पाहिलेली नाही. ज्याप्रकारे सगळे भारतीय क्रिकेटवर प्रेम करतात, तसं जगात कुठे पाहायला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे". अमेरिकेने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये ज्याप्रकारे खेळ केला त्याचंही कौतुक केलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. 

"ज्याप्रकारे सूर्याने झेल घेतला, जर बाहेर पाय टेकला असता तर आजचा दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळे सूर्यकुमार तुझं फार अभिनंदन, सर्व भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते. रोहितने सांगितलंच की, नसता घेतला तर तुला पाहिलं असतं. पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं तर आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं. आमचे लोक फार वेडे आहेत. जिंकल्यानंतर उदोउदो करतात आणि हारल्यावर दगड मारायला कमी करत नाही. आपल्याकडे खेळाडूवृत्ती पाहायला मिळत नाही," असंही अजित पवार म्हणाले. 

यावेळी अजित पवारांनी अनेक माजी खेळाडूंचाही उल्लेख केला. "सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर यांचीही नावं घेतली पाहिजेत. त्यांनी भारतात प्रत्येकाच्या मनात क्रिकेट बिंबवलं आणि रुजवलं. तो खेळ आपला सर्वांचा करण्याचं काम केलं आहे. 1983 मध्येही वानखेडेवर अशीच गर्दी झाली होती. यावेळी सूर्यकुमार यादवने जे काम केलं ते तेव्हा कपिल देव यांनी केलं होतं. रोहित आता टी-20 खेळणार नहाी. पण यापुढे टी-20 पाहताना भारतीयांना त्याची आठवण येईल," असं अजित पवारांनी सांगितलं.