'तो कोणी साधू नाहीय' IIT बाबाबद्दल जुना आखाडाकडून धक्कादायक माहिती समोर

IIT Baba in Mahakumbh: जुना आखाड्याने आयआयटी बाबांची 'हकालपट्टी' केली असल्याची बातमी समोर आली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 19, 2025, 03:21 PM IST
'तो कोणी साधू नाहीय' IIT बाबाबद्दल जुना आखाडाकडून धक्कादायक माहिती समोर title=
आयआयटी बाबा

IIT Baba in Mahakumbh: उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 मोठ्या उत्साहात सुरु आहे. देशभरातील साधुसंत येथे कुंभ स्नानासाठी आले आहेत. या महाकुंभ दरम्यान अनेक साधुंनी आपले लक्ष वेधून घेतले. त्यात आयआयटी बाबा सध्या इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. त्यांचे खूप व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत. गेल्या काही दिवसांपासून आयआयटी बाबा विविध माध्यम वाहिन्यांना मुलाखती देत ​​आहेत. मोठ्या पगाराच्या नोकरीचा त्याग करुन  त्यांनी अध्यात्माचा मार्ग का निवडला? याबद्दल ते सांगत आहेत. दरम्यान जुना आखाडाकडून आलेल्या एका विधानामुळे आयाआयटी बाबा अडचणीत आले आले आहेत. 

जुना आखाड्याने आयआयटी बाबांची 'हकालपट्टी' केली असल्याची बातमी समोर आली आहे. हकालपट्टीचे कारण काय होते हे अद्याप कोणालाही माहिती नव्हते. पण आता जूना आखाड्याचे सचिव महंत डॉ. कर्णपुरी महाराज यांनी पहिल्यांदाच याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

'ते संत नव्हते'

जूना आखाड्याचे सचिव महंत डॉ. करणपुरी महाराज यांनीआयआयटी बाबाबद्दल वक्तव्य केले आहे. आयआयटी बाबा आखाड्याचे नव्हते. ते खूप उद्धट होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबून जेवत असत, असे महंत डॉ. करणपुरी यांनी म्हटले. आयआयटी बाबा टीव्हीवर कुठेही काहीतरी बोलायचे. ते खूप वाईट माणूस असून त्यांना मारहाण करून बाहेर हाकलून लावले जायचे. ते आखाड्याची बदनामी करत होते, असेही ते पुढे म्हणाले. 

'ते कोणाचाही शिष्य नव्हते'

आपण अनेक गुरुंकडे वेगवेगळ्या विद्या शिकलो, त्यामुळे माझे अनेक गुरु आहेत, असे आयआयटी बाबाने आपल्या मुलाखतीत सांगितले होते. पण जुना आखाडाकडून आयआयटी बाबाचे हे विधानही खोडून काढण्यात आले. आयआयटी बाबा येथे फिरत फिरत आले होते, ते कोणाच्या माध्यमातून रिंगणात आले नव्हते. तसेच, ते कोणाचेही शिष्य नव्हते असे डॉ. करणपुरी यांनी म्हटलंय. आयआयटी बाबा चुकीच्या गोष्टी बोलत होते आणि त्यांनी ऐकलेल्या एखाद्याचे नाव वापरायचे असेही ते म्हणाले. सोमेश्वर पुरी यांचे नाव आयाआयटी बाबा सांगतात. पण सोमेश्वर पुरी यांच्या निधनाला 20 वर्षे झाली आहेत. मग आयआयटी बाबा त्यांचे शिष्य कसे असू शकतात? असा प्रश्न त्यांनी विचारला. मुळात आयआयटी बाबा आखाड्याचा भाग कधी झाले याबद्दल कोणतीही माहिती नाही. कोणाचे तरी नाव सांगून ते इकडे तिकडे पडून राहायचे. कधी याच्या तंबूत तर कधी त्यांच्या तंबूत आणि खाण्यापिण्यानंतर ते पळून जायचे, असेही त्यांनी सांगितले. 

आयआयटी बाबा बराच काळ इथे नव्हते. जेव्हा सर्वांना कळले तेव्हा त्यांना येऊ दिले नाही. त्याला कोणी जवळ बसू दिले नाही, तसेच अन्नही दिले नाही. उलट हाकलून लावले. काही दिवसांपूर्वी त्यांना हाकलून लावण्यात आले होते. कोणीही त्याच्याशी संवाद साधत नाही किंवा कोणीही त्यांना आपल्याजवळ बसू देत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

'त्यांच्याबद्दल आखाड्यात राग'

आयआयटी बाबांच्या या कृतींमुळे आखाड्यात प्रचंड संताप आहे. ज्यांच्याकडे आखाड्याची ओळख आहे, अशा लोकांचा आखाडा आदर करतो. या व्यक्तीने अनेक दिवसांपासून त्याचे सत्य लोकांपासून लपवून ठेवले आहे. जे पूर्णपणे चुकीचे असल्याचे आखाड्याच्या सचिवांनी म्हटले आहे.