'मी अक्षर पटेलचा आदर करतो, पण...', राहुल द्रविडने 'व्हीव्हीएस लक्ष्मण'चा उल्लेख करत दिलं उत्तर, 'जर तुम्हाला...'

Rahul Dravid on Axar Patel: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संघात अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याऐवजी कुलदीप यादवला घेण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्याने भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचाही उल्लेख केला.   

शिवराज यादव | Updated: Mar 12, 2024, 03:37 PM IST
'मी अक्षर पटेलचा आदर करतो, पण...', राहुल द्रविडने 'व्हीव्हीएस लक्ष्मण'चा उल्लेख करत दिलं उत्तर, 'जर तुम्हाला...' title=

Rahul Dravid on Axar Patel: भारताने इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका 4-1 ने जिंकत इतिहास रचला आहे. दरम्यान या 5 सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या काही खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला. यामुळे पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतावर नामुष्की ओढवली होती. जखमी होणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा, के एल राहुल यांचा समावेश होता. दरम्यान रवींद्र जाडेजा जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी प्लेईंग 11 मध्ये कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला होता. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राहुल द्रविडने या निर्णयामागील कारणाचा अखेर उलगडा केला आहे. यावेळी त्याने भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचाही उल्लेख केला. 

रवींद्र जाडेजा जखमी झाल्यानंतर संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरचा विचार करु शकत होतं. पण त्यांनी रवींद्र जाडेजाच्या जागी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात घेतलं. राहुल द्रविडने म्हटलं आहे की, जेव्हा मी अक्षर पटेलला सहाव्य क्रमांकावर फलंदाजी करतान पाहतो तेव्हा त्याला पाहून लक्ष्मण जेव्हा या क्रमांकावर फलंदाजी करायचा त्याची आठवण झाली. पण भारतीय संघ सगळे 20 विकेट्स घेत सामना जिंकल्याची आठवणही त्याने करुन दिली. 

"जेव्हा मी अक्षर पटेलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला जाताना पाहतो, तेव्हा मला आठवतं की मी विक्रमकडे पाहून विचार करत होतो की, व्हीव्हीएस लक्ष्मण या क्रमांकावर खेळायचा. मी अक्षर पटेलचा आदर करतो, तो चांगला खेळाडू आहे," असं राहुल द्रविड म्हणाला आहे. 

"माझ्यात आणि रोहित शर्मामध्ये ज्या काही चर्चा होतात त्याचा हाच सार आहे. यामुळेच तुम्ही कसोटी सामने जिंकता. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर 20 विकेट्स घेण्याची क्षमता. हा फार धाडसी निर्णय होता आणि आम्ही तो घेतला याचा आनंद आहे. हा निर्णय घेतल्याचा निकाल दिसत आहे," असं राहुल द्रविडने सांगितलं.

दरम्यान संघात अनेक ज्येष्ठ खेळाडू नसतानाही नवख्या खेळाडूंनी त्यांची पोकळी ज्याप्रकारे भरुन काढली त्याचं राहुल द्रविडने तोंडभरुन कौतुक केलं आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने उसळी घेतली आणि उर्वरित चारही सामने जिंकले. अखेरच्या सामन्यात तर भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. 

"पहिला सामना गमावल्यानंतर आम्ही तेथून पुनरागन करण्याची गरज होती. काही महिन्यांपूर्वी आम्ही जो विचार केला होता, त्यात थोडासा बदल केलेल्या संघाची गरज होती," असं राहुल द्रविडने म्हटलं आहे. ज्याप्रकारे संघाने कामगिरी केली आहे ते पाहून अभिमान आणि आनंद वाटत आहे असंही राहुल द्रविड म्हणाला आहे.

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहली, के एल राहुल असे अनुभवी आणि स्टार खेळाडू संघात नव्हते. विराट कोहलीने मुलाच्या जन्मासाठी संघातून विश्रांती घेतली होती, तर के एल राहुल जखमी झाला होती. यामुळे अनेक नवख्या खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं.