'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा

कल्याणमध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 19, 2024, 09:46 PM IST
'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा title=

धूप लावण्याच्या वादातून कल्याणमध्ये तुफान राडा झाला आहे. या वादात एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली. अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलावून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिजीत देशमुख गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. 

कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारतीत अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. 

या वादातून अखिलेश शुक्ला याने बाहेरून 10 ते 15 जणाना बोलावलं व सोसायटीतील लोकांना लोखंडी रॉडने माराहाण केली. यात विजय कल्वीकट्टे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत. विजय यांवर मुंबई येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सूरू असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे.

विजय कल्वीकट्टे याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "मी रात्री घरी आल्यावर फ्रेश होऊन बसलो होतो. त्याने घरातून आपल्या मित्रांना समोरचं घऱ दाखवलं. यानंतर त्यांनी घराबाहेर उभी सायकल जोरात आपटली. समोरचा माणूस बाहेर आला असता त्यांनी त्याला रॉडने मारहाण सुरु केली. मी काय झालं पाहायला बाहेर आलो तर ते मारहाण करत होते. मी मधे पडलो असता मलाही मारहाण करण्यात आली. महिलांनाही मारहाण केली. ही मराठी माणसं भिकारी आहेत, यांना मारा असं म्हणत शिव्याही दिल्या. त्याला 10 ते 12 टाके पडले आहेत. खाली भेटा, तुम्हाला मारुन टाकतो अशी धमकीही त्याने दिली आहे".

अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करतो. त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो. त्याच्या विरोधात कोणी बोलले तर तो त्याला दमबाजी करतो. काही दिवसांपूर्वी एका किरकोळ कारणावरुन त्याने एका तरुणीला तिच्या बापासमोरच तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी देखील दिली होती. या राड्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अमरनात वाघमोडे यांनी सांगितलं की, धूप लावण्याच्या वादातून हाणामारी झाली आहे. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. अखिलेश शुक्ला याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. 

दरम्यान या प्रकरणात मनसेनेही उडी केली आहे. अखिलेश शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला माझी ताकद माहिती नाही. अशा प्रकारे लोकांना भिती दाखवितो. या बाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. अखिलेश शुक्ला याची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्याने सुरु आहे. दोन दिवसात त्याला अटक केली नाही तर मनसे स्टाईलने शुक्ला याला धडा शिकवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.