बीड जिल्ह्यात कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वाल्मिक कराड यांच्या गुंडगिरीची चर्चा जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात सुरु आहे. अशातच नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच तापलाय. नेमका वाल्मिक कराडवर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. तसंच वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला चाप लावला जाणार का हा प्रश्नही उपस्थित झालाय.
बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडचा गुंडाराज?
वाल्मिक कराडच्या अटकेची विरोधकांची मागणी
बीडमध्ये गुंडांच्या टोळ्या पोसल्याचा आरोप
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनं बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. संतोष देशमुखांचं अपहरण करुन हत्या करणारे विष्णू चाटे, प्रतिक घुले हे आरोपी फक्त छोटे मोहरे असून वाल्मिक कराड हा त्यांचा म्होरक्या असल्याचा आरोप होऊ लागला आहे. बीड जिल्ह्यात दहशतीचं दुसरं नाव वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. पोलीस यंत्रणा या गुंडांच्या हातचं बाहुलं झाल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड हा पोलिसांपेक्षाही मोठा झालाय का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
वाल्मिक कराडच्या सल्ल्यानं बीड जिल्ह्यात पोलिसांची पोस्टिंग होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. वाल्मिक कराडला पोलीस संरक्षण कोणत्या कायद्यानं देण्यात आलंय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीच्या आमदार असलेल्या नमिता मुंदडांनीही या प्रकरणात कठोर कारवाई करुन बीड जिल्ह्यातली कराडची दहशत मोडून काढण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक न झाल्यास जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही संदीर क्षीरसागरांनी केला आहे.
बीड पोलीस मात्र या प्रकरणात कारवाईचं नुसतं सोंग करत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केलंय. तर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
महाराष्ट्र म्हणजे सुसंस्कृतपणा, महाराष्ट्र म्हणजे कायद्याचं राज्य, महाराष्ट्राच्या या प्रतिमेला बट्टा लागत असेल तर ही गुंड प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी फडणवीसांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.