Raj Thackeray on Toll: राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफीची घोषणा केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी हे आपल्या मनसैनिकांच्या आंदोलनाच यश असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवरील केसेस मागे घेतल्या जाव्यात अशी मागणी केली आहे. टोलवसुली म्हणजे दरोडाच होता अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरेंनी टोलसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील केसेस मागे घ्यायला हव्यात का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "केसेस मागे घेतल्या पाहिजेत. तो काय आमच्या घऱचा सत्यनारायण होता का? लोकंसाठी केलेली गोष्ट होती. आज सगळेजण खूश असतील. इतकी वर्षं आपल्यावर टोलधाड पडली होती. याला दरोडाच म्हणावं लागेल. किती पैसे आले, किती जमा झाले, कोणाकडे गेले कशाचा कोणाला पत्ता नव्हता. इतक्या वर्षांच्या आमच्या आंदोलनाला आलेलं हे यश आहे. याबद्दल मी माझ्या मनसैनिकांचं अभिनंदन करतो. सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं आहे'.
याआधीही राज ठाकरेंनी टोलमाफीवर भाष्य केलं होतं. "माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सातत्याने यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसचं सरकार असल्यापासून ते लढा देत आहेत. आपली फसवणूक होत आहे हा मुद्दा आम्ही लोकांसमोर मांडला. आज हे पाचही प्रवेशद्वार बंद झाले आहेत. त्याबद्दल मी सरकारचंही अभिनंदन करेन. उशिरा का होईना पण त्यांना या गोष्टी समजल्या. फक्त काळजी एकाच गोष्टीची आहे की, निवडणुकीच्या तोंडावर टोलानाके बंद करायचे आणि नंतर सुरु करायचे असं होऊन चालणार नाही. तसं आम्ही होऊदेखील देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी टोल बंद करायचे आणि निकाल लागल्यानंतर सुरु करायचे अशी फसवणूक करु नका. अशा अनेक गोष्टी आजपर्यंत घडल्या आहेत," असं राज ठाकरे म्हणाले होते.
पुढे ते म्हणाले होते की, "अनेकांनी टोलनाके बंद करतोय असा शब्द दिला, पण नंतर पैसे पूर्ण वसूल न झाल्याने सुरु करावे लागतील असे प्रकार झाले आहेत. जर असा निर्णय झाला असेल तर लोकांनाही समाधान आहे. अखेर किती पैसे येतात आणि कुठे जातात हे कळण्याचा मार्ग नाही. आजपर्यंत झालेला व्यवहार सगळा रोख होता. ते कोणाकडे गेले, कोणाला किती मिळाले, कोणच्या खिशात किती जमा झाले यावर सगळेच गप्प होते. आता श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येतील. पण जगाला हे आंदोलन कोणी केलं हे माहिती आहे. राज ठाकरेने एखादं आंदोलन केल्यास काय होतं असा प्रश्न तुम्ही विचारता, तर हे असं होतं".