परळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर व्हायचीय, कोणत्या जागी कोणता उमेदवार उभा करायचा याची रणनिती आखली जात आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 18, 2024, 01:53 PM IST
परळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : लोकसभेत सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीची लढत ठरली ती बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Loksabha Constituency). इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Sharadchandra Pawar NCP) बजरंग सोनवणेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. त्यामुळे, येथील मतदारसंघात शरद पवारांनी लावलेलं उमेदवाराचं गणित चांगलंच जुळलं. आता, विधानसभेलाही शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलंय... त्यामुळे, यंदाची निवडणूक धनंजय मुंडेंसाठी चांगलीच आव्हानात्मक असणार आहे.
 
बीडमध्ये शरद पवारांची खेळी
लोकसभेआधी राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 9 जागांवर विजय मिळवला. मात्र यात सर्वात मोठा विजय ठरला तो बीडमधला. पंकजा मुडेंचा पराभव करत बीड लोकसभेतून बजरंग सोनवणे यांनी विजयाचा गुलाल उधळला. हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यातच अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघाकडे शरद पवारांनी लक्ष द्यायला सुरुवात केलीये. यामध्ये धनंजय मुंडेंचा परळी विधानसभा मतदारसंघ शरद पवारांनी मनावर घेतला आहे.

परळी मतदारसंघ मुंडे घराण्याचा बालेकिल्ला
2009 साली गोपीनाथ मुंडे लोकसभेत गेल्यानंतर पंकजा मुंडेंकडे परळीचं नेतृत्व आलं.  पंकजा मुंडे 2009 आणि 2014 दोन टर्म परळीच्या आमदार राहिल्या. 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत परळीत हायहोल्टेज सामना रंगला.  2019 मध्ये पंकजा मुंडेंना पराभूत करुन प्रथमच धनंजय मुंडे विजयी झाले. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे शरद पवारांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या विरोधात मविआ तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. 

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राजाभाऊ फड यांचा पक्ष प्रवेश आणि सुदामती गुट्टे, सुनील गुट्टे आणि राजेसाहेब देशमुख यांचे परळी मतदारसंघात सुरु असलेले दौरे यावरून शरद पवारांनी मतदारसंघात चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास धनंजय मुंडेंना घरी बसवण्याचा चंगच इच्छुकांनी बांधलाय..

प्रत्येक निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघांमध्ये मुंडे विरोधी मतांचा एक प्रवाह पाहायला मिळतो. तोच मतांचा प्रवाह एकत्र करून यंदाची विधानसभा निवडणूक विजयाकडे कशी नेता येईल, यासाठी शरद पवारांनी रणनिती आखलीये.. सोबतच मराठा आंदोलनचा असलेला प्रभाव पाहता इथं जो उमेदवार पवार रिंगणात उतरवणार आहेत त्यामुळे परळीची लढत ही धनंजय मुंडेंसाठी अवघड होण्याची शक्यता आहे...