मुंबई : आलं हे भारतीय मसाल्यांमध्ये लोकप्रिय आहे. औषधांपासून चहा किंवा अगदी नियमित जेवणात आल्याचा हमखास वापर केला जातो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडले आहेत. त्यामुळे पित्त, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असल्यास त्याचा हमखास वापर केला जातो. मात्र काही जणांसाठी आलं हे घातक ठरू शकते. म्हणूनच तुम्हांला 'या' आजाराचा धोका असल्यास आल्याच्या सेवनापासून दूर रहा.
हिमोफेलियाचा त्रास असणार्यांनी आल्यापासून दूर रहाणं गरजेचे आहे. कारण आल्याच्या सेवनामुळे रक्त पातळ होण्याला चालना मिळते.
गरोदर स्त्रियांना पहिल्या तिमाहीमध्ये मोशन सिकनेसचा त्रास होत असल्यास आलं चघळणं फायदेशीर आहे. मात्र अंतिम टप्प्यात आल्याच्या अतिसेवनामुळे प्रिमॅच्युअर डिलेव्हरी किंवा लेबरचा धोका बळावतो.
नियमित औषधगोळ्या घेणं तुमच्यासाठी अनिवार्य असल्यास आल्यापासून दूर रहा. औषधांमध्ये बेटा ब्लॉकर्स, अॅन्टी कोगुलॅंट्स, इन्सुलिन घटक आणि आलं हे मिश्रण एकत्र आल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो.
वजन वाढवणार्यांसाठी 'आलं' मदत करत नाही. उलट आल्याच्या सेवनामुळे भूक मंदावते. त्यामुळे वजन वाढवणार्यांसाठी आल्याचे सेवन तुमच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते.