मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी योग्य आणि पुरेशी झोप आवश्यक असते. कमी झोपेमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. झोप कमी झाल्याने डायबिटीज, स्ट्रोक तसेच लठ्ठपणाच्या समस्या सतावतात. चांगल्या झोपेमुळे डोके शांत राहते, पाचनक्रिया सुरळीत राहते. यासोबतच रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
१. जर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नसेल तर दिवसांतून कमीत कमी १० ते २० मिनिटे झोप घ्या. यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल तसेच कामावरही लक्ष लागेल.
२. झोपण्याच्या २० ते ३० मिनिटांआधी कोमट पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने शरीरातील मांसपेशींना आराम मिळतो. यामुळे चांगली झोप होते.
३. अनेकांना झोपताना लाईट, आवाजाचा तसेच तापमान बदलाचा त्रास होतो. नीट झोप येत नाही. त्यामुळे एकटे झोपण्याचा प्रयत्न करा. कारण अनेकदा दोन वेगवेगळ्या माणसांच्या बॉडी टेम्परेचरमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
४. व्यायाम केल्याने चांगली झोप येते कारण यामुळे डोके शांत राहते. मात्र व्यायाम केल्यानंतर लगेचच झोपू नका. चांगल्या झोपेसाठी कमीत कमी ३ ते ६ तास आधी व्यायाम करा.
५. झोपण्याआधी तीन ते चार तास आधी जेवावे. कारण जेवल्यावर लगेच झोपल्यास पोटात अॅसिडिटीमुळे जळजळ होण्याची शक्यता असते.