Saif Attacker Bangladesh Connection: सैफ अली खानवर चाकू हल्ला कऱणाऱ्या आरोपीचं बांगलादेश कनेक्शन समोर आलंय. आरोपी मोहम्मद शहजाद बांगालादेशी नागरिक असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे यातून देशात अवैध घुसखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.काय आहे आरोपीचं बांगलादेश कनेक्शन? जाणून घेऊया.
सैफवर चाकू हल्ला कऱणारा मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असल्याची मोठी माहिती पोलिस तपासात समोर आलीय. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.तो बांगलादेशातून भारतात अवैधरित्या आला आणि ओळख पटू नये म्हणून त्यानं विजय दास असं नाव बदलल्याचा दावाही पोलिसांनी केलाय.
पोलिसांनी जरी आरोपी बांगलादेशी असल्याचा दावा केला असला तरी मात्र आरोपीच्या वकिलांनी कोर्टात पोलिसांचा दावा फेटाळलाय.. मोहम्मद शहजाद हा भारताचाच रहिवाशी असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे.
आरोपी शहजाद हा बांगलादेशी असल्याचा दावा पोलिसांनी केल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झालंय.. किरीट सोमय्या तर थेट ठाण्यातील कासारवडवली इथल्या लेबर कॅम्पमध्ये गेलेत.. बिल्डरांकडून कामासाठी बांगलादेशी नागरिक अवैधरित्या आणले जात असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.तर मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानं विषय दुसरीकडे वळवण्यात येत असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे.
दरम्यान सैफवर झालेल्या हल्ल्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला.कट्टर पंथियांकडून सैफवर हल्ला तर झाला नाही ना अशी शंका जितेंद्रा आव्हाड यांनी उपस्थित केली होती. आता आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्केंनी केलीय.
गेल्या काही वर्षा हजारो बांगलादेशी अवैधरित्या देशात शिरल्याचा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केलाय. कुणाच्या आशीर्वादानं बांगलादेशी भारतात येतात असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय.. त्यामुळे बांगलादेशींना मदत कऱणा-यांपर्यंत आमचं सरकार पोहोचणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.
मोहम्मद शहजाद हा बांगालदेशातून भारतात आले असेल तर नक्कीच देशासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे अशा घुसखोरांची नाका बंदी करण्याची नितांत गरज आहे. या घटनेवरून महाराष्ट्रात अवैध घुसखोरांचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झालाय. सरकार यावर कठोर पावलं उचलले अशी अपेक्षा करायला सैफवरील चाकू हल्ल्याची घटना पुरेशी आहे.