धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी? शिर्डी अधिवेशनात काय बोलले नेते?

NCP Behind Dhananjay Munde: सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर विरोधकांनी आरोप केल्याने धनंज मुंडे अडचणीत सापडलेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 19, 2025, 08:53 PM IST
धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी? शिर्डी अधिवेशनात काय बोलले नेते? title=
धनंजय मुंडे

NCP Behind Dhananjay Munde: मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आलेत. या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलीय. मात्र सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंडेंच्या पाठिशी असल्याचं पाहायला मिळतंय. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात नेत्यांच्या बोलण्यातून हेच चित्र पाहायला मिळालं.

सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर विरोधकांनी आरोप केल्याने धनंज मुंडे अडचणीत सापडलेत. त्यातच मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड या प्रकरणात अटकेत असल्यानं मुंडे यांच्यावर दबाव वाढलाय. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्या पाठिशी असल्याची चर्चा सुरू झालीय. शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.  बीड प्रकरणावरून जे वादळ उठलं होतं  ते थांबण्याचं काम  धनंजय मुंडेंनी भाषणातून केल्याचं अजित पवार म्हणालेत..  

तर मागील काही दिवसांपापासून तुम्ही कोणत्या परिस्थातीतून जाताय हे आम्ही पाहतोय. तुम्ही आलात आणि मनमोकळेपणाने बोललात हे बरं झाल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सहानुभुती व्यक्त करत पाठिशी असल्याचे संकेत दिलेत.  बीड प्रकरणामुळे राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळतंय. तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलीय.. अशातच राष्ट्रवादी मात्र धनंजय मुंडेंच्या पाठिशी ठाम उभी असल्याचं नेत्यांच्या बोलण्यातून दिसून येतंय.

पालकमंत्रिपदावर स्पष्टच बोलले

शिर्डीमध्ये दाखल झाल्याबद्दल बोलताना धनंजय मुंडेंनी, "साईबाबांच्या दर्शनाने नवी उर्जा मिळते. त्याच ऊर्जेतून आम्ही काम करतोय," असं म्हटलं. यानंतर पत्रकारांनी बीडच्या पालकमंत्रिपदी अजित पवारांचं नाव जाहीर झालं असून तुम्हाला डावललं गेल्याची चर्चा आहे असं विचारलं असता धनंजय मुंडेंनी, "बीडची सध्याची स्थीती पाहून मीच दादांना विनंती केली की बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी घ्यावी. जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा ही माझी भावना आहे," असं उत्तर दिलं. 

वाल्मिकचा उल्लेख करत विचारला प्रश्न

तुमचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत, असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मोजून चार शब्दांमध्ये उत्तर दिलं. वाल्मिक कराडशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी, "हे सगळं खोटं आहे," असं उत्तर दिलं.त्यानंतर अन्य एका पत्रकाराने, सारंगी महाजनांच्या आरोपांवर काय म्हणाल? असं विचारलं असता त्यावर धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा 'हे सर्व काही खोटं आहे' असं मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. सारंगी महाजन यांनी मुंडेंवर जमिनीच्या व्यवहारांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता.

आरोप करणाऱ्यांना मुंडेंची विनंती

विरोधकांनी तुम्हाला बीडचं पालकमंत्रिपद मिळून नये म्हणून विरोध केल्याने तुम्हाला संधी दिली नाही, असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडेंनी, "त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय आहे हे अधिक महत्वाचं आहे. मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली की बीडची जबाबदारी आपण घ्यावी. विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा. मात्र मला आत्ता यावर काही बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही," असं सूचक विधान केलं. पुढे बोलताना धनंजय मुंडेंनी, "आत्ताची परिस्थीती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचंय तर करा मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका," अशी विनंती आरोप करणाऱ्यांना केली.