Neeraj Chopra Marriage : ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने केलं गुपचूप लग्न; कोण आहे त्याची पत्नी?

Neeraj Chopra Marriage: ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने गुपचूप लग्न केलंय. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी दिलीय.

नेहा चौधरी | Updated: Jan 19, 2025, 11:10 PM IST
Neeraj Chopra Marriage : ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने केलं गुपचूप लग्न; कोण आहे त्याची पत्नी? title=
सौजन्य इन्स्टाग्राम

Neeraj Chopra Marriage: ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा कधी लग्न करणार अशी चर्चा 2-3 वर्षांपासून सुरु होती. नवीन वर्षांची सुरुवात नीरज चोप्राने आयुष्याचा नवीन अध्यायाने केलीय. रविवारी त्याचा सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. हो, नीरज चोप्रा विवाहित झाला आहे. नीरज चोप्राच्या पत्नीचं नाव हिमानी आहे. सोशल मीडियावर नीरजने लग्नाचे तीन फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neeraj Chopra (@neeraj____chopra)

 

 नीरजने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिलंय - 'माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहे. या क्षणी आम्हाला एकत्र आणलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ. या शब्दात त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 27 वर्षीय नीरजने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्नी हिमानीसोबत मंडपात बसलेला फोटो शेअर केलाय. हिमानीचे पूर्ण नाव हिमानी मोर असून ती सोनीपत जिल्ह्यातील लाडसौली गावची आहे.

स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, हिमानी मोरने तिचे सुरुवातीचे शिक्षण सोनीपतच्या शाळेतून केले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी घेतली. त्यानंतर तिने अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील दक्षिणपूर्व लुईझियाना विद्यापीठातूनही शिक्षण घेतलंय. तिने अमेरिकेतच शिक्षणसोबत टेनिस खेळ खेळलाय. आता तिने टेनिस कोचिंगही सुरू केलंय.

अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमधील फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात स्वयंसेवक टेनिस प्रशिक्षक म्हणूनही तिने काम केलं. सध्या, ती त्याच देशातील मॅसॅच्युसेट्स राज्यातील ॲम्हर्स्ट कॉलेजमध्ये पदवीधर असिस्टंट आहे आणि त्याच कॉलेजच्या महिला टेनिस संघाला प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त, ती पूर्णपणे तिचं व्यवस्थापन देखील करत आहे. मॅककॉर्मॅक आयझेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून ती स्पोर्ट्स मॅनेजमेंट शिकत आहे.

या फोटोमध्ये वधू आणि वरसोबत फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह उपस्थितीत दिसत आहेत. नीरज चोप्राने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये त्याची आई लग्नाचे विधी करताना दिसतंय. हिमानीसोबतच्या लग्नाच्या घोषणेनंतर नीरज चोप्राच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांच्या फॉलोअर्स आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राच्या लग्नाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अनेक वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्याला विचारण्यात आले की तो कधी लग्न करणार किंवा त्याची गर्लफ्रेंड आहे की नाही, पण नीरजने त्याबद्दल कधीही खुलासा केला नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतरही जेव्हा त्याच्या घरच्यांना लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने कधीच काहीही सांगितले नाही, पण आता नीरज आणि त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही अडचण न करता शांतपणे लग्नाची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

नीरज चोप्रा हा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. 2016 मध्ये अंडर-20 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जिंकून तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्येही सुवर्णपदक जिंकलं. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने 87.58 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकून भारतीयांना अभिमानाचा क्षण दिला. तर ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरून त्याने इतिहास रचला. त्यानंतर नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून आपल्या कामगिरीला नव्या उंचीवर नेलं. याशिवाय नीरज जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपची गोल्ड आणि डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय आहे.