रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 9, 2024, 04:55 PM IST
रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण title=

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. एकीकडे जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा घाम काढत असताना हर्षित राणा, मोहम्मद सिराज यांची त्याला योग्य साथ मिळताना दिसत नाही. यामुळे भारतीय गोलंदाजी अडचणीत आली आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला केवळ 10 विकेट्स घेण्यात यश आलं आणि ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. गुलाबी चेंडूच्या कसोटीतील पराभवामुळे मोहम्मद शमीला बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना करण्यात आलं. भारतीय कर्णधार रोहित शर्माला शमीच्या उपलब्धतेबद्दल विचारण्यात आलं असता त्याने स्पष्ट उत्तर दिलं नाही. 

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला शमीच्या उपलब्धतेबद्दल विचारण्यात आलं असता त्याने शमीसाठी संघाचे दरवाजे उघडे असल्याचं सांगितलं. "आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत, कारण सय्यद मुश्ताक अली खेळताना त्याच्या घोट्याला सूज आली होती. ज्यामुळे कसोटी सामन्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीत अडथळा आला होता, आम्हाला पूर्ण काळजी घ्यायची आहे. आम्हाला त्याला येथे आणून पुन्हा दुखापत बाहेर काढण्याची इच्छा नाही," असं रोहित शर्माने सांगितलं आहे. 

"आम्हाला 100 टक्के खात्री करायची आहे, कारण आता बराच वेळ झाला आहे. आम्हाला त्याच्यावर इथे येण्यासाठी आणि संघाचसाठी कर्तव्य बजावण्यासाठी दबाव टाकण्याची इच्छा नाही. त्याच्यावर व्यावसायिक पद्धतीने लक्ष ठेवलं जात असून, जे सांगितलं जाईल त्याच्या आधारे निर्णय घेतला जाईल. त्याचा प्रत्येक खेळ पाहिला जात आहे. पण त्याच्यासाठी दरवाजे उघडे आहेत आणि तो कधीही येऊन खेळू शकतो," असं रोहित म्हणाला आहे. 

दरम्यान दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये सगळं काही ठीक नाही.  गेल्या महिन्यात जेव्हा भारत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिका सुरु होती तेव्हा रोहितने शमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे हे अमान्य करत त्याच्या गुडघ्यात सूज आहे असं सांगितलं होतं. याआधी, शमीने प्रसारमाध्यमांनी आपल्याला दुखापत झाल्याचं दिलेलं वृत्त चुकीचं आहे असं सांगितलं होतं. त्याने पुनरुच्चार केला होता की तो तंदुरुस्त आहे आणि जाण्याची तयारी करत आहे. 

सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तानुसार, "जेव्हा शमी एनसीएमध्ये होता, तेव्हा बंगळुरुमधील पहिल्या कसोटीदरम्यान त्याची रोहितशी भेट झाली. रोहित शर्माने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेवियाविरोधातील कसोटी मालिकेतील शमीच्या उपलब्धतेबद्दल केलेल्या विधानावरुन यावेळी दोघांमध्ये फार शाब्दिक चकमक उडाली".

बंगळुरूमधील पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला रोहितने सांगितलं होतं की, “सध्या, तो या मालिकेसाठी किंवा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी फिट असेल की नाही हे सांगणे आमच्यासाठी खूप कठीण आहे". 

"त्याला नुकताच एक धक्का बसला होता, त्याच्या गुडघ्यावर सूज आली होती, जी खूपच असामान्य होती. तो तंदुरुस्त होण्याच्या प्रक्रियेत होता, 100% च्या जवळ आला होता आणि त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. त्यामुळे तो थोडा मागे पडला. त्यामुळे त्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली," असं रोहितने सांगितलं होतं.