Amit Shah On Vinod Kambli: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज विनोद कांबळी यांच्या भेटीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. यामध्ये विनोद कांबळी खूपच खंगलेल्या अवस्थेत दिसतोय. विनोद कांबळी सध्या बॅड पॅचमधून जातोय. त्यासाठी 1982 ची क्रिकेट बॅच पुढे सरसावली आहे. विनोदवर अशी वेळ यायला नको होती, अशा भावना क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. सोशल मीडियात प्रत्येकजण विनोद कांबळीच्या तडाखेबाज फलंदादीच्या आठवणी शेअर करत आहेत. या दरम्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील विनोद कांबळीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
एक काळ असा होता जेव्हा विनोद कांबळीकडे सचिन तेंडुलकरप्रमाणे पैसा आणि प्रसिद्धी होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता विनोद कांबळीला शरीरही साथ देत नाहीय. त्याच्याकडे चांगले आयुष्य जगण्यासाठी पैसेही नाहीयत. त्याला आजारांनीही घेरलंय. आता विनोद कांबळीचा उदरनिर्वाह बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद कांबळीसोबतची एक आठवण सांगितली आहे.
चेन्नईत एका क्रिकेट कार्यक्रमादरम्यान विनोद कांबळी मला भेटला होता. तेव्हापर्यंत तो निवृत्त झाला होता. पण एक जमान्यात तो खूप चांगला बॅट्समन होता. मी त्याला विचारले, 'तुमच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले. पण तुम्ही सर्वात आनंदी कधी होतात?' विनोदने मला सांगितले, 'सर, मी बड्या खेळाडुंना हैराण केलंय. आम्ही जिंकले आणि खूप रेकॉर्ड तोडले. पण आजदेखील मी सर्वात खूश तेव्हा असतो, जेव्हा एखाद्या युवा खेळाडुला बॅकफूटवर खेळायला शिकवतो.'
विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय पातळीवर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतासाठी 100 हून अधिक वनडे खेळल्या आहेत. सचिन तेंडुलकरचा तो बालपणीचा मित्र आहे. एकेकाळी दोघांची मैत्री खूप चर्चेत असायची. पण एकिकडे सचिन क्रिकेटचा देव बनला. तर दुसरीकडे विनोद कांबळी वेदनादायी आयुष्य जगतोय. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी विनोद कांबळीसोबतच्या मुलाखतीची आठवण सांगितली.
विनोद कांबळीने भारतासाठी 104 वनडे आणि 17 टेस्ट मॅच खेळल्या आहे. त्याने आपली अखेरची टेस्ट 1995 मध्ये खेळली होती. तर 2000 साली 50 ओव्हरचा फॉर्मॅट खेळायला उतरला होता.