'तुम्हाला जर साधं घरच्या मैदानावर....', बांगलादेशने 2-0 ने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी दिग्गज संतापले

बांगलादेशने 2-0 ने पाकिस्तानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव करत कसोटी मालिका जिंकली आहे. यानंतर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू संतापले असून संघाला खडेबोल सुनावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Sep 3, 2024, 07:32 PM IST
'तुम्हाला जर साधं घरच्या मैदानावर....', बांगलादेशने 2-0 ने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी दिग्गज संतापले title=

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या खराब फॉर्ममध्ये करत असून आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली आहे. बांगलादेशने तुलनेने पाकिस्तानसाऱख्या बलाढ्या संघाला कसोटी मालिकेत हरवलं आहे. बांगलादेशने 2-0 ने मालिका जिंकली आहे. बांगलादेशने दुसरा कसोटी सामना सहा विकेट्सने जिंकला असून, यानंतर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू संतापले आहेत. हे फार चिंताजनक आणि दुखावणारं असल्याचं ते म्हणाले आहेत. मागील 10 कसोटी सामन्यांमधील पाकिस्तानचा हा सहावा पराभव आहे. बांगलादेशने पहिल्यांदा पाकिस्तानचा कसोटी मालिकेत पराभव केला आहे. 

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद म्हणाले आहेत की, "आपलं क्रिकेट कोणत्या स्तरावर पोहोचलं आहे हे पाहून वाईट वाटतं. बांगलादेशला त्यांच्या शिस्तबद्ध कामगिरीसाठी श्रेय द्यायला हवं. पण ज्याप्रकारे आपली फलंदाजी कोसळली ते फार वाईट लक्षण आहे".

पाकिस्तानने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला संघातून वगळल्यानंतर आणि नसीम शाहला विश्रांती दिल्यानंतर दुसऱ्या कसोटीत बांगलादेशच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात वर्चस्व गाजवलं. पाकिस्तानने बांगलादेशची स्थिती पहिल्या डावात 6 बाद 26 धावा अशी केली होती. पण शतकवीर लिटन दास आणि मेहदी हसन मिराझ यांनी शानदार भागीदारी रचच संघाला तारलं.

पाकिस्तान बोर्डातील भांडणामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला आहे, असं जावेद मियाँदाद म्हणाले आहेत. "मी फक्त खेळाडूंना जबाबदार धरणार नाही. कारण गेल्या दीड वर्षात बोर्डात जे काही घडलं आहे त्याचा आणि कर्णधारपद आणि व्यवस्थापनातील बदलांचा संघावर परिणाम झाला आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

तसंच पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल-हकने तीन मालिका गमावणं आणि घरच्या मैदानावरील 9 पैकी एकही न जिंकणं फार चिंताजनक आहे असं म्हटलं आहे. "घरच्या मैदानावरील सर्वोत्तम संघाविरोधातही मालिका जिंकण्याची सर्वाधिक संधी असते. पण यासाठी फलंदाजांनी धावा करण्याची गरज असते," असं त्याने म्हटलं.

पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेकिंग फलंदाज युनिस खान याने जेव्हा संघ सतत पराभूत होतो तेव्हा त्यातून बाहेर येणं कठीण असतं असं सांगितलं आहे. "आपल्या फलंदाजांनी भुतकाळात धावा केल्या आहेत. आता त्यांचं मनोबल वाढवण्याची आणि यातून बाहेर येण्यासाठी मदत करण्याची गरज आहे," असं तो म्हणाला.
 
माजी कसोटीपटू अहमद शेजादने मात्र बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा न करणाऱ्या फलंदाजांना फटकारलं आहे. तो म्हणाला, “तुम्ही घरच्या मैदानावरही थोडा वेग आणि हालचाल हाताळू शकत नसाल तर भविष्य फारसे उज्ज्वल नाही".

माजी कसोटी फिरकीपटू, इक्बाल कासिम याने संघ व्यवस्थापनाला विद्यमान आणि आगामी फिरकीपटूंना व्यवस्थित तयार करण्यास सांगितलं आहे. “आपल्याकडे सर्फराज नवाज, इम्रान खान, वसीम अक्रम, वकार किंवा शोएबसारखे गोलंदाज नाहीत. त्यामुळे घरच्या मैदानावर कसोटी जिंकण्यासाठी आपल्या फिरकीपटूंवर अवलंबून राहायला हवे,” असं तो म्हणाला.