Harbhajan Singh : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा (Team India) ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाला. जवळपास 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमावली. या पराभवाला काही दिवस उलटून गेले असले तरी अजूनही याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरूच आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील काही गोष्टी बाहेर लीक झाल्या होत्या, आणि या प्रकरणी गौतम गंभीरने (Gautam Gambhir) थेट युवा फलंदाज सरफराज खानचे नाव घेऊन तो मीडियामध्ये ड्रेसिंग रूममधील सर्व गोष्टी लीक करत असल्याचे म्हटले. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे. सध्या हरभजनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेर लीक केल्याप्रकरणी गौतम गंभीरने थेट सरफराज खानचं नाव घेऊन त्याच्यावर आरोप केले. मात्र ही बाब माजी क्रिकेटर हरभजन सिंहला पटली नसून त्याने म्हटले की गंभीरने अशा प्रकारे कोणाचं नाव घ्यायला नको होतं. हरभजन सिंह म्हणाला की, "सरफराज खान भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. त्याला यापुढे भारतासाठी खेळायचंय. अशात त्याने काही चुका केल्या असतील तर त्याच्या सोबत बसून त्याला समजावलं पाहिजे. मागील काही दिवसांपासून जे काही सुरु आहे, मग ते ऑस्ट्रेलियात असो वा त्याच्यानंतर... ते काही ठीक नाही. जिंकणे आणि हरणे सुरूच आहे. पण दररोज ड्रेसिंग रूममधील नवीन गोष्टी समोर येऊ नयेत".
हेही वाचा : Champions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?
हरभजन सिंहने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, "आज काही रिपोर्ट्स समोर आले आहेत की भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने म्हटले की, सरफराज खानने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्या आहेत. जर त्यांनी असं म्हटलं असेल तर त्यांनी असं करायला नको होतं. जर सरफराजने असं केलं असतं तर तुम्ही प्रशिक्षक होता त्याच्याशी बोलू शकत होता. तो एक खेळाडू आहे, त्याला समजवा. तो युवा खेळाडू आहे जो भविष्यात भारतासाठी खेळेल".
पुढे भज्जीने म्हटले की, "वरिष्ठ खेळाडू असल्याच्या नात्याने युवा खेळाडूंना ज्ञान देणं आपलं कर्तव्य असतं आणि जर गंभीरने सांगितले की सरफराजने ड्रेसिंग रूममधील गोष्टी लीक केल्या तर सरफराजने हे चुकीचे केले. ड्रेसिंग रूममधील गोष्टी अशा प्रकारे समोर यायला नको. गंभीर या कामात नवखा आहे आणि त्याला थोडा वेळ द्यायला हवा आणि खेळाडूंना देखील नव्या गोष्टींचा ताळमेळ येण्यासाठी वेळ द्यायला हवा".
2017 नंतर आयसीसी यंदा प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत असून ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल पद्धतीने खेळवली जाईल. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद असून दुबईत भारताचे सर्व सामने खेळवले जातील. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार असून 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. तर भारताचा पहिला सामना हा 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध खेळवला जाईल. भारताचा शेवटचा लीग सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल.