Chhagan Bhujbal NCP Adhiveshan: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर (NCP Adhiveshan Ajit Pawar Group) सुरु आहे. शिर्डीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील हजेरी लावली. मात्र, छगन भुजबळांच्या उपस्थितीमुळे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपली नाराजी कायम असल्याचं छगन भुजबळांनी आपल्या देहबोलीतून दाखवून दिलं आहे.
राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना भुजबळ तडकाफडकी निघून गेले. अधिवेशनात छगन भुजबळांनी अवघ्या एका तासासाठी हजेरी लावली. अजित पवारांची भेट घेतली का? यावर भुजबळांनी बोलण्यास नकार दिला. प्रफुल्ल पटेल दोन तास घरी येऊन बसले, सुनील तटकरेंनी विनंती केली म्हणून आलो असं म्हणत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा उघडपणे आपला नाराजी व्यक्त केली. मी श्रद्धेनं वागलो. मात्र मला आश्रद्धेने वागणूक दिली अशी मनातील सल त्यांनी बोलून दाखवली. नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबीर नाही असंही छगन भुजबळ म्हणाले.
मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या आजच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र, भुजबळ अधिवेशनाला हजेरी लावत सर्व चर्चांचा पूर्ण विराम दिला. प्रकृती अस्वस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन भुजबळ यांनी शिबिराला हजेरी लावल्याचे समजते.