मनसेची साथ सोडून भाजप पुन्हा शिवसेनेसोबत

नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज पोटनिवडणूक होतेय. लोकसभेतल्या पराभवानं खचलेल्या मनसेकडे महापालिकेत सत्ता असूनही या प्रभागात उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळं मनसे या निवडणुकीपासून दूरच राहिलीय. तर शिवसेनेशी काडीमोड घेऊन नाशिकमध्ये मनसेबरोबर संसार मांडणाऱ्या भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेशी सलगी केलीय.

Updated: Jun 29, 2014, 01:48 PM IST
मनसेची साथ सोडून भाजप पुन्हा शिवसेनेसोबत title=

नाशिक : नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज पोटनिवडणूक होतेय. लोकसभेतल्या पराभवानं खचलेल्या मनसेकडे महापालिकेत सत्ता असूनही या प्रभागात उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळं मनसे या निवडणुकीपासून दूरच राहिलीय. तर शिवसेनेशी काडीमोड घेऊन नाशिकमध्ये मनसेबरोबर संसार मांडणाऱ्या भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेशी सलगी केलीय.

नाशिककर रविवारी पुन्हा नगरसेवकपदाच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. निवडणूक जरी दोन प्रभागांची असली तरी नाशिकचं आजचं गुंतागुंतीचं आणि सोयीचं राजकरण आणि भविष्यातल्या विधानसभा निवडणुकीची नांदी दर्शवणारी ही निवडणूक ठरणार आहे. प्रभाग क्रमांक ६१चे मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी दीड वर्षापूर्वी शिवसेनाचा भगवा खांद्यावर घेतला. तर प्रभाग १७ मधून काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी बसपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नगरसेवकपदावर पाणी सोडलं. निकालानंतर गोडसे दिल्लीत पोहचले तर पाटील तिथेच राहिले. त्यामुळे या दोन रिक्त जागांसाठी रविवारी पोटनिवडणूक होतेय. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक स्वबळावर लढलेल्या आणि सत्तेत मनसेसोबत असणारी भाजप यावेळी सोयीचं राजकारण खेळतंय. भाजप शिवसेना आरपीआय महायुतीसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय.

लोकसभेतल्या पराभवानंतर खचलेल्ल्या मनसेनं उमेदवारच उभा केला नाही. वास्तविक पाहता हेमंत गोडसे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन मनसेच्याच उमेदवाराचा पराभव केला. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेला पक्ष दुसऱ्या पक्षाबरोबर हातमिळवणी करतोय, अशा परिस्थितीत उर्मीनं आणि जिद्दीनं मनसेनं निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही आणि त्यासाठी कारण दिलं जातंय विधानसभा निवडणुकीचं...

रविवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १७ मधून भाजप शिवसेना महायुतीकडून दोन महिन्यांत काँग्रेस, बसप असा राजकीय प्रवास करून भाजपात दाखल झालेले दिनकर पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सदशिव माळी यांच्यात लढत आहे. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक ६१ मध्ये महायुतीचे केशव पोरजे आणि काँग्रेस आघाडीचे रविंद्र हांडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या चौघांमध्ये कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे लक्ष लागलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.