Everything You Want To Know About Guardian Ministers: महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या स्थापनेला काही आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 42 मंत्र्यांपैकी 34 जणांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे. असं असतानाच पालमंत्रिपदावरुन नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आल्याने भरत गोगावले समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा महामार्गावर टायरची जाळपोळ करुन रस्ता रोको केला. त्याचप्रमाणे दादा भुसेंसहीत अन्य काही मान्यवरांना यंदा पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळालेल नाही. यावरुन आता महायुतीमधील घटक पक्षांमध्ये तू-तू मैं-मैं दिसून येत आहेत. मात्र पालमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर हे मंत्री नेमकं करतात तरी काय? हे पद इतकं महत्त्वाचं का असतं? पालकमंत्र्यांची कामं काय? त्यांना कोणते अधिकार असतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्यांना ठाऊक नसतात. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात या मंत्रिपदाबद्दलची महत्त्वाची माहिती...
पालकमंत्री या नावामध्येच बराच अर्थ सामावलेला आहे. पालकांप्रमाणे एखाद्या जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तीवर असते तो जिल्ह्यातील सर्वच समस्या आणि विषयांची अगदी पालल्याची काळजी केली जाते तशी काळजी घेत विषय मार्गी लावतो त्याला सर्वसामान्य भाषेत पालकमंत्री असं म्हणता येईल. पालकमंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. पालकमंत्री हा जिल्हा प्रशासन व राज्य सरकारमधील एक महत्वाचा दुवा असतो. पालकमंत्री जिल्हा प्रशासनला मार्गदर्शन करण्याचं काम करतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रशासनामार्फत अमलबजावणी करुन घेण्याचं काम पालकमंत्री करतात.
पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. पालकमंत्री हे विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकाकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नियुक्त केले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्रात सध्या युती सरकारकडून 34 पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे प्रत्येकी दोन जिल्ह्यांचं पालकत्व देण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List
अगदी थोड्यात सांगायचं झालं तर पालकमंत्री हे जिल्हाधिकाऱ्यांच्या वरचे पद असते असं म्हणता येईल. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक योजना आणि उपक्रम वेगवेगळ्या विभागांत राबवण्यापासून ते जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापर्यंत सर्व उपाय योजना करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे पालकमंत्र्यांचे मुख्य उद्दीष्ट असतं.
जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देणे आणि पाठिंबा देण्याबरोबरच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी काम करणे ही पालकमंत्र्यांची प्राथमिक जबाबदारी असते. जिल्ह्यातील दैनंदिन कामाकाजाशीसंबंधित मोठी कामं ज्यामध्ये औद्योगिक श्रेत्र, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, महामार्ग, विमानतळ, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करणे यासह विविध समस्यांवर समन्वय साधण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरी संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर देखरेख ठेवण्याचे काम पालकमंत्र्यांचेच असते.
नक्की वाचा >> 'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया
पालकमंत्री पद हे पक्षाचे जिल्ह्यावर नियंत्रण वाढवण्याचा मार्ग म्हणून पाहिले जाते. यामागील मुख्य कारण म्हणजे पालकमंत्री हे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत विषयांशी संबंधित असल्याने त्यांचा थेट लोकांशी जवळून संबंध येतो. पालकमंत्री हे थेट लोकांशी जोडलेले आणि त्यांना जवळचे वाटणारे प्रतिनिधी असतात आणि पालकमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवतात. म्हणूनच आपलं राजकीय वजन वाढवण्याच्या दृष्टीने हे पद मिळावं म्हणून सध्या महाराष्ट्रात दिसत आहे तशीच रस्सीखेच हे पद मिळवण्यासाठी सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.