Devendra Fadnavis Government Big Decision: महायुतीच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदेंसहीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हंगमी अध्यक्षपदावर कोण नियुक्त होणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 7 डिसेंबरपासून पुढील तीन दिवस होणार आहे. नियमाप्रमाणे सरकार स्थापन झाल्यानंतर भरवलं जाणारं हे विशेष अधिवेशन असणार आहे. यानंतर 16 तारखेपासून पुढील चार दिवस हिवाळी अधिवेशन होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हंगामी अध्यक्ष कोण असणार हे स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कालिदास कोळंबकर हे खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचे निकटवर्तीय तसेच कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आज हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर राजभवनात जाऊन शपथ घेणार आहेत. उद्यापासून देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन सुरू होणार असल्याने आजच हंगामी अध्यक्षांचा शपथविधी राजभवनामध्ये पार पडणार आहे. या विशेष अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणासह आमदारांचा शपथविधीही पार पडणार आहे. विशेष अधिवेशनाचा कारभार चालवण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. अध्यक्षांची निवड केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालवता येत नाही. अध्यक्षांच्या देखरेखीखालीच सभागृह काम करतं. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणार असलं तरी निवडणूक आलेल्या प्रत्येकाला आमदारकीची शपथही त्यापूर्वी द्यावी लागते. यासाठीच विशेष अधिवेशन बोलवलं जातं.
कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे कालिदास कोळंबकर यांनी यंदा सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला आहे. म्हणजेच गेल्या 40 वर्षांपासून ते सलग जिंकत आहेत. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला 9 निवडणुकांनंतरही अभेद्य राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये वडाळ्यातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढलेल्या कालिदास कोळंबकर यांना 66 हजार 800 मतं मिळाली. 24 हजार 973 मतांनी त्यांनी निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांचं आव्हान होतं. मुंबईच्या माजी महापौर असलेल्या श्रद्धा यांना 41827 मतं मिळाली. तसेच मनसेच्या स्नेहल जाधव यांना 6972 मतं मिळाली.
कालिदास कोळंबकर हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. नारायण राणेंसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 ला मोदी लाटेतही कोळंबकर जिंकून आले होते. नंतर नारायण राणेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर कालिदास कोळंबकरांनीही काँग्रेसला रामराम ठोकला होता. 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा निवडणूक जिंकली.