'मी त्याचवेळी सांगितलं होतं की राजकारणात सगळेच...'; CM फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पहिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis First Comment On Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 6, 2024, 08:18 AM IST
'मी त्याचवेळी सांगितलं होतं की राजकारणात सगळेच...'; CM फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पहिली प्रतिक्रिया title=
पत्रकाराच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

CM Devendra Fadnavis First Comment On Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच भाजपाशासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या आझाद मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस फडणवीस यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकल्यानंतर आधी फडणवीस हसले आणि त्यानंतर त्यांनी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.

उद्धव नेमकं काय म्हणाले होते?

जुलै महिन्यामध्ये मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत निशाणा साधला होता. आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फडणवीसांविरोधात दंड थोपटले होते.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही आठवड्यांनी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी, "आताही ज्या कोणाला पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जा! माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा, मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे. ज्यावेळी अर्जुनाने सगळे नातेवाईक समोर आहेत पाहिलं तेव्हा यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का वेदना? कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा फडणवीसाचा डाव होता. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो आहे. एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन," असं म्हटलं होतं. 

नक्की वाचा >> 'शिंदे दादा, आमचा डिसेंबरचा हफ्ता...', लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हात जोडत म्हणाले, 'सगळं...'

फडणवीस काय म्हणाले?

ठाकरेंच्या याच विधानाचा संदर्भ देत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या फडणवीस यांना गुरुवारी प्रश्न विचारण्यात आला. 'एक तर तुम्ही राहणार नाहीतर मी, असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल?' असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला. हा प्रश्न ऐकताच फडणवीस आधी हसले आणि त्यानंतर त्यांनी, "मी त्याचवेळी सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात. तेही राहतील, मी ही राहणार आणि आम्ही सगळेच राहणार आहोत," असं उत्तर दिलं.