लोकसभा निवडणूक २०१९ : गोव्यात शिवसेना स्वतंत्र रिंगणात, दोन उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपशी जमवून युती करणाऱ्या शिवसेनेने गोवा राज्यात स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.  

Updated: Mar 16, 2019, 05:28 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : गोव्यात शिवसेना स्वतंत्र रिंगणात, दोन उमेदवार जाहीर title=

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपशी जमवून युती करणाऱ्या शिवसेनेने गोवा राज्यात स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे येथे भाजपच्या राज्यात शिवसेनेने युती न करता उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी लक्ष लागले आहे. गोव्यात भाजपने शिवसेनेशी युती करण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे. गोव्यात भाजपची सत्ता आहे. शिवसेनेचे अस्तित्व नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला सोबत घेतले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काही स्थानिक राजकीय पक्ष यांनीही भाजपपासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळ गोव्यामध्ये भाजपची वाट अवघड असल्याची चर्चा आहे. येथे काँग्रेसशी खरी टक्कर आहे. त्यातच शिवसेना निवडणूक रिंगणात उतरल्याने भाजपला मजविभागणीचा फटका बसू शकतो.

गोवामध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. उत्तर गोवा मतदारसंघातून शिवसेनेचे गोवा अध्यक्ष जितेश कामत तर उपाध्यक्ष राखी प्रभूदेसाई नाईक दक्षिण गोवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, युतीबाबत शिवसेनेने गोवा भाजपशी कोणताही चर्चा केली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. केवळ शिवसेनाच नाही तर गोव्यातले स्थानिक पक्षही भाजपसोबत जाण्यास फारसे राजी नसल्याचे दिसून येत आहेत. २०१७मध्ये गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, स्थानिक पक्षांच्या पाठिंब्यावर भाजप गोवामध्ये सत्तेत आले. तेव्हा मनोहर पर्रिकर यांचे नेतृत्व असेल तरच भाजपला पाठिंबा देऊ असा पवित्रा स्थानिक पक्षांनी घेतला होता. मात्र, पर्रिकर यांची तब्बेत ठिक नाही. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यामुळे गोव्यात भाजपसोबत जाण्यात अन्य पक्ष उत्सुक नसल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्र गोमांतक पक्षही (मगोप) भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. म्हापसा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी भाजप आणि महाराष्ट्र गोमांतक पक्षातील वाद पुढे आला होता. २०१४ निवडणुकांमध्ये भाजपने गोव्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांवर विजय मिळवला होता. आता मात्र, परिस्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. तसेच गोव्यातील भाजपचे मताधिक्यही २०१७ निवडणुकांमध्ये बरेच कमी झाले होते. त्यामुळे गोव्यातील वाट अवघड झाली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. २३ एप्रिलला गोव्यामध्ये मतदान होणार आहे.