Bank Employees Salary Hike: नवं वर्ष सुरु झालं आणि साधारण सुरुवातीचे दोन- तीन महिने उलटले की अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे पगारवाढीचे. वार्षिक वेतनवाढीनंतर खात्यात येणारी वाढीव रक्कम नोकरदार वर्गासाठी सुखावह ठरते. अशाच एका मोठ्या नोकरदार वर्गासाठी ही आनंदाची बातमी. एकिकडे 2024 अर्थात यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं केंद्राच्या वतीनं सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करत पगारवाढीची भेट दिली आणि त्यामागोमागच आता बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची बातमीही आली आहे.
बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय झाला असून तो 2022 नोव्हेंबरपासून लागू असेल असं सांगण्यात आलं आहे. या निर्णयानुसार बँकेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एरियर अर्थात थकबाकी रकमेसह पगाराची रक्कम मिळणार आहे. पण, पगार नेमका किती फरकानं वाढणार?
समजा एखाद्या पदवीधर उमेदवारानं एप्रिल 2024 मध्ये बँकेत नोकरी सुरु केली, तर 11 व्या द्विपक्षीय सेटलमेंट करारानुसार त्याला 19990 रुपये मूळ वेतन, 3263 रुपये स्पेशल अलाऊन्स, 600 रुपये ट्रान्सपोर्ट अलाऊन्स, 11527 रुपये महागाई भत्ता आणि 2039 रुपये एचआरए म्हणजेच एकूण 37,421 रुपये इतका पगार मिळणं अपेक्षित होतं. पण, आता 12 व्या द्विपक्षीय सेटलमेंट करारानुसार पगाराची ही रक्कम 45337 रुपये इतकी असेल. म्हणजेच दर महिन्याला सरासरी 7916 रुपये अर्थात साधारण 21 टक्के पगारवाढ मिळणार आहे.
बँकेत वरिष्ठ लिपिक अर्थात सिनियर क्लार्क पदावर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 11 व्या द्विपक्षीय सेटलमेंट करारानुसार एप्रिल 2024 मध्ये 133168 रुपये इतकं वेतन मिळणं अपेक्षित होतं. यामध्ये मूळ वेतन 65830 रुपये, स्पेशल पे 2920 रुपये, पीक्यूपी 3045 रुपये, स्पेशल अलाऊन्स 10796 रुपये, एफपीपी 2262 रुपये, महागाई भत्ता 40,356 रुपये आणि एचआरए 7358 रुपये अशी पगाराची विभागणी होती. पण, इथंही 12 व्या द्विपक्षीय करारानुसार आता पगाराची एकूण रक्कम 1,62,286 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे वरिष्ठ लिपिकांच्या पगारात एकूण 29,118 रुपयांची अर्थात 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. इथं मूळ वेतनाचाच आकडा 93960 रुपये इतका आहे.
बँकेच्या सबस्टाफ अर्थात ड्राफ्टरी विभागात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या तरतुदींनुसार एप्रिल 2024 मध्ये 71,598 रुपये पगार येणं अपेक्षित होतं. पण 12 व्या द्विपक्षीय करारानुसार आता पगाराची एकूण रक्कम 86,651 रुपये इतकी होणार आहे. यामध्ये 52510 रुपये मूळ वेतन, 13941 रुपये स्पेशल अलाऊन्स, एफपीपी 1585 रुपये, ट्रान्सपोर्ट अलाऊन्स 850 रुपये, महागाई भत्ता 10810 रुपये, एचआरए 5510 रुपये आणि वॉशिंग अलाऊन्स 300 रुपये अशी पगाराची विभागणी करण्यात आली आहे. थोडक्यात बँक कर्मचाऱ्यांना दणदणीत पगारवाढ मिळणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.