Loksabha Election 2024 : देशातील राजकीय वातावरण क्षणाक्षणाला बदलत असतानाच आता नेतेमंडळींसह देशातील नागरिकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळतेय ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची. येत्या काही दिवसांतच देशात आचारसंहिता लागू होणार असून, त्यानंतर पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत. तत्पूर्वी एका महत्त्वाच्या आकडेवारीनं देशातील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचंही लक्ष वेधलं आहे. एबीपी सीवोटर ओपिनियन पोलच्या माध्यमातून ही आकडेवारी समोर आली आहे. (ABP Cvoter Opinion Poll 2024)
एकिकडे देशाचे पंतप्रधान विविध स्तरांवर प्रचार करत असतानाच एनडीएला येत्या निवकणुकीत 400 जागा आणि एकट्या भाजपला 370 जागांवर विजय मिळणार असल्याचं आश्वासक वक्तव्य करत आहेत. त्यातच आता ओपिनियन पोलच्या आकडेवारीतून मतदरांचा कल नेमका कोणत्या पक्षांकडे आहे हे स्पष्ट होत आहे. येत्या काळात देशात निवडणुका झाल्या तर, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजपला मोठ्या फरकानं विजही होण्याची सहज संधी आहे. तर, देशाच्या दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये मात्र त्यांना काहीशी पिछेहाट सहन करावी लागणार असून, इथं इंडिया आघाडीचं पारडं जड दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या यंदाच्या सत्रामध्ये गुजरातमध्ये भाजप सर्व 24 जागांवर क्लिन स्वीप करताना दिसेल असं ओपिनियन पोलमध्ये सांगण्य़ात आलं आहे. इथं काँग्रेसला सपशेल अपयशी ठरवत भाजप 64 टक्के मतं मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, राजस्थानातही चित्र वेगळं नसेल असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्येसुद्धा भाजपच्याच वाट्याला यश जाण्याचा अंदाज ओपिनियन पोलच्या आधारे वर्तवला जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये केरळातील जागांवर अनेकांच्या नजरा असतील. इथं अनेक दिग्गज मैदानात असल्यामुळं एकूण 20 जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांना यश मिळण्याचा अंदाज ओपिनियम पोलमधून समोर आला आहे. तामिळनाडूमध्येही चित्र काहीसं एकसारखंच असेल. इथं 39 जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांना यश मिळणार असून, भाजपला मात्र एकाही जागेवर यश मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.