'हा कसला माज', उझबेकच्या ग्रँडमास्टरने भारतीय तरुणीसह हस्तांदोलनास दिला नकार; नंतर म्हणाला 'फार विचित्र...', VIDEO व्हायरल

उझबेकचा ग्रँडमास्टर याकुब्बोएवने (Yakubboev) भारतीय बुद्धिबळपटू वैशालीसोबत (Vaishali) हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. यानंतर याकुब्बोएवने पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 27, 2025, 04:34 PM IST
'हा कसला माज', उझबेकच्या ग्रँडमास्टरने भारतीय तरुणीसह हस्तांदोलनास दिला नकार; नंतर म्हणाला 'फार विचित्र...', VIDEO व्हायरल title=

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत (Tata Steel Chess Tournament) ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव्ह (Nodirbek Yakubboev) याने भारतीय ग्रँडमास्टर वैशालीशी (Vaishali) हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यामुळे एकच वाद निर्माण झाला. त्यानंतर अखेर उझबेकने माफी मागितली असून आपला अनादर करण्याचा हेतू नव्हता, 'धार्मिक कारणांमुळे' आपण हे केलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. चेसबेस इंडियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, वैशाली चौथ्या फेरीच्या हस्तांदोलनासाठी हात पुढे करताना दिसत आहे. पण याकुबबोएव्ह काहीही प्रतिसाद न देता खाली बसतो. 

23 वर्षीय नोदिरबेक याकुबबोएव्ह 2019 मध्ये ग्रँडमास्टर झाल होता. या सामन्यात त्याचा पराभव झाला असून, चँलेंजर्स सेक्शनमध्ये 3 पॉईंटवर आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने एक्सवर एक भलामोठी पोस्ट शेअर केली असून, स्पष्टीकरण दिलं आहे. "मी वैशाली आणि तिचा लहान भाऊ प्रज्ञानंद यांचा आदेर करतो. पण धार्मिक कारणांमुळे मी इतर महिलांना स्पर्श करत नाही," असं त्याने सांगितलं आहे. 

"मला वैशालीसह नेमकं काय झालं ही स्थिती समजावून सांगायची आहे. सर्व महिला आणि भारतीय खेळाडूंचा आदर राखत मला सांगायचं आहे की, मला प्रत्येकाला सांगायचं आहे मी धार्मिक कारणांमुळे इतर महिलांना स्पर्श करु शकत नाही," असं नोदिरबेक याकुबबोएव्हने सांगितलं आहे. तो मुस्लीम धर्माचं पालन करतो. 

उझबेकच्या खेळाडूला हरवल्यानंतर वैशालीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला नाही. आठ फेऱ्यांनंतर  भारतीय खेळाडूचे चार गुण झाले आहेत आणि अजून पाच गुण शिल्लक आहेत. "मी वैशाली आणि तिच्या भावाचा भारतातील सर्वात बलवान बुद्धिबळपटू म्हणून आदर करतो. जर मी माझ्या वागण्याने तिला दुखावले असेल तर मी माफी मागतो. माझ्याकडे काही अतिरिक्त स्पष्टीकरणे आहेत: १. बुद्धिबळ हराम नाही. मी जे करायला हवे ते करतो. मी इतरांना विरुद्ध लिंगाशी हस्तांदोलन करू नये किंवा महिलांनी हिजाब किंवा बुरखा घालू नये असा आग्रह करत नाही. काय करावं हा प्रत्येकाचा निर्णय आहे," असे त्यांनी स्पष्ट केलं.

याकुब्बोएव म्हणाला की, रोमानियाच्या इरिना बुलमागा विरुद्धच्या आठव्या फेरीच्या सामन्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी, त्याने तिला त्याच्या धार्मिक श्रद्धांबद्दल आधीच माहिती दिली होती.

"आज (रविवार) मी इरिना बुलमागाला याबद्दल सांगितले. तिने ते मान्य केले. पण जेव्हा मी खेळण्याच्या हॉलमध्ये आलो तेव्हा मध्यस्थांनी मला सांगितले की मी किमान आदर म्हणून नमस्ते करावे. दिव्या आणि वैशालीसोबतच्या सामन्यांमध्ये मी त्यांना खेळापूर्वी याबद्दल सांगू शकलो नाही आणि एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली," असं तो पुढे म्हणाला.