राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.
नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.