'आगे आगे देखो होता है क्या,' देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले 'काँग्रेसचे अनेक नेते...'

काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा खुलासा भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधानही यावेळी त्यांनी केलं आहे. 

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2024, 01:43 PM IST
'आगे आगे देखो होता है क्या,' देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले 'काँग्रेसचे अनेक नेते...' title=

Devendra Fadnavis on Ashok Chavan: काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा खुलासा भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 'आगे आगे देखो होता है क्या' असं सूचक विधानही यावेळी त्यांनी केलं आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाबद्दल विचारण्यात आलं असता, मला तुमच्याकडूनच ही माहिती मिळाली असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला. 

महाराष्ट्रात राजकीय भूकंप! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा

"काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस गेल्या काही वर्षात वाटचाल करत आहे त्यातून कुठेतरी जनेतेचे नेते नाराज आहेत. ते पक्षात गुदमरत आहेत. मुख्य प्रवाहात काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे देशभरात एक ट्रेंड सुरु आहे. जनतेचे नेते अशी ओळख असणारे भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते भाजपाकडे येतील हा मला विश्वास आहे. आज मी इतकंच सांगू शकतो की, आगे आगे देखो होता है क्या," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले की, "अनेक पक्षाचे नेते आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसमधील जनतेचे नेते पक्षाच्या नेतृत्वामुळे गुदमरत आहेत. कारण राजकारणामुळे देशहिताला बाजूला ठेवण्याचं काम त्यांचं नेतृत्व करत आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत ज्याप्रकारे प्रगती करत आहे, ते पाहता या नेत्यांना मुख्य प्रवाहात तसंच जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे. जे संपर्कात आहे त्यांचा खुलासा हळूहळू होईल".

"आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. पण महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील लोक काही ना काही प्रमाणात संपर्कात असतात आणि आहेत. त्यांची पक्षात येण्याची इच्छा आहे. काहीजण निर्णय घेत आहेत, काही घेऊ शकत नाही आहेत. पण हे निश्चितपणे सांगतो की, भाजपासह आणि खासकरुन मोदींसह जावं अशी भावना सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे," असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

पंकजा मुंडे यांचं पूर्ण भाषण न दाखवता, दोन वाक्य दाखवून त्याचा वेगळा अर्थ लावला जातो. विनाकारण त्यांच्या प्रतिमेला दुखापत होईल असं काम करु नये. पक्षात त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच उद्धव ठाकरे जे काही बोलत आहेत ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच त्यांना मी लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.