Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष का सोडला? ते भाजपच्या वाटेवर आहेत का, असे सवाल उपस्थित होत आहेत. तसंच, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येतेय. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्षातील अनेक आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी मी काँग्रेसचा हिरो मी कुठेही जाणार नाही, माझ्यामागे ईडी लावता येणार नाही, असं म्हणत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर थेट स्पष्टीकरण दिले आहे. तसंच, चव्हाणांच्या राजीनाम्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण साहेब काय बोलतील हे पाहावं लागेल पण चव्हाण घराणं हे काँग्रेसचे मोठे घराणे आहे असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनाच तिकिट मिळणार नाही आधी त्यांच तिकीट कन्फर्म होऊ द्या मग त्यांच्या पक्षात कोण येणार आहे हे सांगा म्हणावं, असा टोलाही धंगेकर यांनी लगावला आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी धक्का मानला जातोय. येत्या काही दिवसांत काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. विधानसभा अध्यक्षांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का? यावर चर्चा असतानाच त्यांनी मी भाजपात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस पक्षात होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. येत्या दोन दिवसांत पुढची राजकीय भूमिका जाहीर करेन, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही काही पहिलीच वेळ नाही, इंडिया शायनिंगच्या वेळेस ही मोठ्या संख्येने लोक गेले होते. जे राहिले ते जिद्दीने लढले आणि आमचं त्यावेळेस सरकार आलं, असंच काहीस यावेळेस होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही. अंतर्गत धुसफूस असून काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.