भारतीय जनता पक्षभाजप
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ मध्ये स्थापन केलेला भारतीय जनसंघ हे भारतीय जनता पक्षाचं मुळ आहे. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या निर्माणासाठी जनसंघासह इतर पक्षांचं विलय करण्यात आलं. तीन वर्ष सत्तेत राहिल्यानंतर १९८० मध्ये जनता पक्ष विघटीत झाला आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. देशातील २ मुख्य राजकीय पक्षांपैकी भाजप हा एक पक्ष आहे. १९८० साली भाजप या पक्षाची स्थापना झाली. १९८४ च्या निवडणुकीत भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. आज याच पक्षाचे २८२ खासदार संसदेत निवडून गेले आहेत. २०१४ मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी तब्बल ३१.३४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. संघटनात्मक पातळीवर तब्बल ११ कोटी लोकांनी भाजपचं सदस्यपद घेतलं आहे.
भाजप देशातलाच नाही तर जगातला सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात युतीचे ४८ पैकी ४२ खासदार निवडून आले होते. त्यापैकी भाजपचे २३ खासदार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला १२२ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यात नगर परिषदांच्या निवडणूकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. अनेक महापालिकांवर देखील भाजपने झेंडा फडकवला आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला एकूण १४,७०९,४५५ मते मिळाली. राज्यातील एकूण २७.८ टक्के मतदान भाजपला मिळालं.