ऋषभ पंतच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ, ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार

Rishabh Pant : आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना लखनऊ सुपर जाएंट्सच्या फ्रेंचायझीने ऋषभ पंतची आयपीएल 2025 साठी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 20, 2025, 06:01 PM IST
ऋषभ पंतच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ, ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार title=
(Photo Credit : Social Media)

Rishabh Pant : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतने (Rishabh Pant) आयपीएलमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने ऋषभसाठी तब्बल 27  कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात घेतले. आता आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना लखनऊ सुपर जाएंट्सच्या फ्रेंचायझीने ऋषभ पंतची आयपीएल 2025 साठी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार ठरला आहे.

आयपीएल इतिहासातील महागडा कर्णधार : 

लखनऊ सुपर जाएंट्स फ्रेंचायझीचे मालक संजीव गोयंका यांनी सोमवारी 20 जानेवारी रोजी नव्या सीजनसाठी ऋषभ पंतची कर्णधार म्हणून नेमणूक केली. ऋषभ पंत हा 2016 पासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मात्र आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं. यापूर्वी ऋषभ पंतमने 2021, 2022 आणि 2024 च्या आयपीएल सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सच नेतृत्व केलं होतं. त्यामुळे पंतने स्वतःचं नाव 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये नोंदवलं होतं. ऋषभ पंतला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रेंचायझी उत्सुक होत्या. 

ऋषभसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनऊ सुपर जाएंट्स या संघांमध्ये मोठी लढत होती. लखनऊने पंतवर 20.75 कोटींची बोली लावली. या किंमतीवर दिल्ली कॅपिटल्स RTM कार्ड घेऊन पंतला आपल्या संघात घेण्यासाठी तयार होते. तेवढ्यात लखनऊने ही थेट 7 कोटी वाढवून ऋषभ पंतवर 27 कोटींची बोली लावली. ही बोली आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूवर लागलेली सर्वात मोठी बोली होती. दिल्लीने RTM कार्ड सह 27 कोटींना पंतला घेण्यास नकार दिला. त्यामुळे लखनऊने ऑक्शनमध्ये ऋषभ पंतला 27 कोटींना खरेदी केलं. 

हेही वाचा : भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळालं नाही स्थान, DSP सिराजने घेतला मोठा निर्णय

 

काय म्हणाले संजीव गोयंका?

लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हणाले की, “एलएसजीच्या भावी कर्णधार दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ पंत आहे. आम्ही त्याला लिलावात विकेट घेतलं तेव्हाच हा निर्णय घेतला होता, परंतु आम्ही त्याची घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होतो." ऋषभ पंत हा लखनऊ संघाचा चौथा कर्णधार आहे. यापूर्वी केएल राहुल, कृणाल पंड्या, निकोलस पूरन या खेळाडूंनी लखनऊचे कर्णधारपद सांभाळले.