Harsha Richariya Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर 'साध्वी' म्हणून चर्चेत आलेली हर्षा रिछारिया पुन्हा एकदा महाकुंभमध्ये परतली आहे. चर्चेत आल्यानंतर तिच्याभोवती वादही निर्माण झाला होता. रविवारी दुपारी हर्षा रिछारिया श्रीपंचायती निरंजनी आखाड्याच्या शिबिरात पोहोचली होती. यावेळी संतांनी तिला मुलगी म्हणून गौरवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आखाडा परिषद आणि निरंजनी आखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरी म्हणाले की, 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या अमृत स्नानात हर्षाला निरंजनी आखाड्याच्या शाही रथातून संगमाला नेले जाईल, जेणेकरून या वेशात त्रिवेणीच्या पवित्र भूमीत पवित्र स्नान करता येईल.
शांभवी पीठाधीश्वर स्वामी आनंद स्वरूप म्हणाले की, महंत रवींद्र पुरी यांनी असं पाऊल उचलू नये. ते आखाडा परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. सनातन धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, म्हणून त्यांनी पुन्हा शाही रथावर बसवण्याचा हेतू सोडून द्यावा.
आप सभी अपने परिवार के साथ महाकुंभ जरूर आयें #एकता_का_महाकुम्भ #mahakumbh2025 #prayagraj pic.twitter.com/JtS8Bn4u8r
— Harsha (@Host_harsha) January 20, 2025
१४ जानेवारी रोजी महाकुंभात मकर संक्रांतीच्या दिवशी निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीत हर्ष रिछारिया रथावर बसली होती. हर्षाच्या रथावर बसण्यावर आणि अशा प्रकारे फोटो काढण्यावर संतांनी आक्षेप नोंदवला होता. बंगळुरूमधील शाकंभरी मठाचे मुख्य पुजारी स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हे करणे योग्य नाही. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. त्यांनी इशारा दिला की, "अशा प्रकारे धर्माला प्रदर्शनाचा भाग बनवणं धोकादायक ठरू शकतं. संत आणि ऋषींनी हे टाळावे, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल".
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही आपला विरोध व्यक्त केला. महाकुंभात अशी परंपरा सुरू करणं चुकीचे आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. यातून विकृत मानसिकता दिसून येते असंही ते म्हणाले आहेत. त्यांनी सांगितलं की, "महाकुंभात, शरीराचे सौंदर्य नाही तर हृदयाचे सौंदर्य पाहिले पाहिजे. ज्या व्यक्तीला संन्यास घ्यायचा की लग्न करायचे हे ठरवता आलेले नाही त्याला संत आणि महात्मांसोबत रथावर बसवावे हे अजिबात योग्य नाही. हर्ष रिछारिया भक्त म्हणून सहभागी झाली असती तर बरे झाले असते. पण तिला भगवे कपडे घालून रथावर बसवायला लावणं चुकीचं आहे."
संतांनी विरोध केल्यानंतर हर्षा रिछारिया कुंभ सोडून गेली होती. आता तिने कुंभ सोडून जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. आपण पूर्ण 45 दिवस महाकुंभमध्ये राहणार असल्याचं जाहीर केली आहे. त्यांनी रवींद्र पुरी आपल्या वडिलांसमान असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण महाकुंभ सोडून न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे.