Kolhapur : कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना जडीबुटी आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमानवर कोल्हापूर महापालिकेने कारवाई केलीय. गेली आठ दिवस सलमान सेफ कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी मोफत आयुर्वेदिक तेल लावत होता. सलमानचे आयुर्वेदिक तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी देखील मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, या संदर्भातील बातम्या आल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला तब्बल आठ दिवसानंतर जाग आली. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आक्षेप घेत सलमानकडे आयुर्वेदिक तेला संदर्भात विचारपूस केली आहे. त्याचबरोबर टक्कलग्रस्तांना लावत असलेल्या आयुर्वेदिक तेलाच्या संशोधनासंदर्भात देखील महापालिकेने पुरावे सादर करण्याचे सलमानला आदेश दिले आहेत. या पुढे महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना तेल न लावण्याच्या सूचना देखील कोल्हापूर महापालिकेने सलमानला दिल्या आहेत. आयुर्वेदिक तेला संदर्भात काही संशोधन असेल तेही सादर करण्याचे आदेश सलमान सेफला महानगरपालिकेने दिले आहेत.
कागदपत्रे आणून देतो म्हणत सलमानने ठोकली धूम
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सलमान याच्याकडे आयुर्वेदिक तेला संदर्भात कागदपत्रांची मागणी करताच त्याने आपण कोल्हापुरातील राजारामपुरी येथील जेंट्स पार्लरमध्ये काम करत असल्याचे सांगितले. तसेच न्यू पॅलेस परिसरात राहत असल्याचं सांगत त्याने लगेच कागदपत्रे आणून देतो म्हणत धूम ठोकली. धूम ठोकताच सलमानने त्याचा मोबाईल देखील बंद करून ठेवला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सलमानच्या विरोधात नोटीस बजावून योग्य ती कारवाई करण्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा यांनी दिली.
सलमानकडे कोणती पदवी आहे का?
टक्कलग्रस्तांना डोक्यावर केस येण्यासाठी मोफत औषध देतो असे सांगून सलमानने कोल्हापुरात मोठी गर्दी जमवली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ज्यामध्ये सलमान खरोखरच डॉक्टर आहे का? त्याच्याकडे कोणती पदवी आहे का? त्याच्या औषधाचा गुण येतो का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची चौकशी करावी अशी देखील मागणी काही लोकांनी केली आहे.